

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : एकीकडे आरोग्य खाते डेंग्यू आणि पावसाळी आजारांबाबत जनजागृती मोहीम हाती घेत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात तब्बल 103 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. तर 479 जणांच्या रक्तांची तपासणी करण्यात आली असून सर्वाधिक रूग्ण बेळगाव तालुक्यात आढळले आहेत.
कोरोना महामारीमुळे आरोग्य खात्याची झोप उडाली होती. आता कोरोना नियंत्रणात असताना डेंग्यूचा फैलाव वेगाने होत आहे. पंधरा दिवसांपासून आरोग्य खात्याकडून डेंग्यू नियंत्रण मास राबवण्यात येत आहे. पण, याच काळात रूग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून आली आहे. एकट्या जुलै महिन्यात 24 रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य खात्याची झोप उडाली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियाची रूग्ण मिळत असतात. पण, यंदा डेंग्यूच्या अधिकृत रूग्णांची संख्या वाढली असल्यामुळे प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे. घरच्या आसपास परिसरात साचून राहिलेल्या स्वच्छ पाण्यावर डेंग्यू डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे परिसरात पाणी साचणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
दरवर्षी जिल्ह्यामध्ये डेंग्यू डोके वर काढत असते डेंग्यूची लक्षणे आढळून आल्यास तातडीने रक्त तपासणी करून तज्ञ डॉक्टर कडून उपचार घेणे गरजेचे आहे. अन्यथा हलगर्जी पुन्हा केल्यास जीवावर देखील भेटू शकते. दरवर्षी डेंग्यूमुळे मृत्युमूखी पडणार्यांची संख्या देखील अधिक आहे. डेंग्यू रुग्ण आढळण्यात बेळगाव तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे आरोग्य खाते खडबडून जागे झाले असून आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गावागावाला भेटी देऊन जनजागृती केली जात आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 103 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे हा फैलाव रोखण्यासाठी आम्ही गावोगावी जागृती करत आहोत. 479 जणांच्या रक्ताची चाचणी केली असून जुलै महिन्यात सर्वाधिक रूग्ण सापडले आहेत.
– डॉ. एम. एस. पल्लेद, जिल्हा रोग नियंत्रण अधिकारी