बेळगाव : साथीच्या रोगांचा तालुक्यात प्रादूर्भाव | पुढारी

बेळगाव : साथीच्या रोगांचा तालुक्यात प्रादूर्भाव

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  पावसाबरोबर ग्रामीण भागात साथीच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया यासारख्या आजारांचा फैलाव होत असून ग्रामीण भागातील नागरिक हैराण झाले आहेत. डासांच्या वाढत्या प्रादूर्भावाचा फटका बसत आहे.
मागील काही दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण येळ्ळूर परिसरात आढळून आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकार्‍यांकडून याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात येत नसला तरी अनेक रुग्ण खाजगी दवाखान्यांतून उपचार करून घेत आहेत. याकडे प्रशासनाने काणाडोळा केला आहे.

पावसाच्या आगमनाबरोबर डासांचे प्रमाण वाढते. त्यातून साथीच्या रोगांचा प्रसार झपाट्याने होतो. त्यामुळे आरोग्य खात्याकडून जून महिन्यात खबरदारीचे उपाय आखण्यात येतात. त्यानुसार जागृती करण्यात येत आहेत. परंतु हे प्रयत्न तोकडे पडत आहेत. यातून रोगाचा प्रसार वाढत आहे.

काही दिवसांपूर्वी येळ्ळूर, अवजारहट्टी परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. मागील वर्षी याभागात काही रुग्ण दगावले होते. परंतु शेवटपर्यंत आरोग्य खात्याच्या अधिकार्‍यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. पावसामुळे पाण्याची डबकी साचतात. त्यामध्ये डासांची उत्पत्ती होते. विशेषत: डेंग्यू रोगाचा प्रसार करणार्‍या डासांची उत्पती स्वच्छ पाण्यात होते. त्यामुळे याबाबत घरातूनच खबरदारी घेणे आवश्यक आहे.
सध्या गावागावांतून थंडी, ताप, खोकला रुग्णांची संख्या वाढली आहे. बदलत्या हवामानाचा फटका बसला आहे. त्याचबरोबर साथीच्या रोगांचाही प्रादूर्भाव वाढला आहे.

शाळांतून जागृती
दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील गावांतून जागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया याबाबत माहिती देण्यात येत आहेत. स्वच्छतेचे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचार्‍यांकडून करण्यात येत आहे.

दवाखान्यांत गर्दी
ग्रामीण भागामध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. यामध्ये सर्दी, ताप, खोकला यापासून अनेक रुग्णांचा समावेश आहे. उपचारासाठी ग्रामीण भागात दवाखान्यांतून गर्दी वाढली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांतूनही गर्दी होत आहे.

Back to top button