

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : येथील एका आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएसच्या तिसर्या वर्षात शिकणार्या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. आनंद हणमंत वारे (वय 21, रा. जेड गल्ली शहापूर, मूळचा रा. नंदनवन हाऊसिंग सोसायटी पनवेल, मुंबई) असे मृताचे नाव आहे. घटनेची नोंद शहापूर पोलिस स्थानकात झाली आहे. याप्रकरणी दोन तरुणींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंदचे वडील हणमंत वारे हे मुंबई येथे पोलिस दलात हेडक्वॉन्स्टेबल आहेत. सध्या वारे कुटुंबीय जेड गल्ली शहापूर वास्तव्यास आहेत. आनंद हा आयर्वेदिक महाविद्यालयात तिसर्या वर्षात शिकत होता. गेल्या 6 महिन्यांपासून प्रेमप्रकरणातून दोन तरुणींकडून त्याला मानसिक त्रास देण्यात येत होता. या कारणातूनच मानसिक त्रासाने आनंदने दि. 7 रोजी रात्री 10 ते दि. 8 रोजी दुपारी 2.30 च्या वेळेत घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर दोन तरुणीने दिलेल्या मानसिक त्रासातून त्याने आत्महत्या केल्याची तक्रार आनंद वडील हणमंत वारे यांनी शहापूर पोलिस स्थानकात दाखल केली आहे. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेऊन तपास हाती घेतला आहे.