आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी बेळगावमार्गे दोन विशेष रेल्वे सोडणार | पुढारी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी बेळगावमार्गे दोन विशेष रेल्वे सोडणार

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीनिमित्त तीर्थक्षेत्र पंढरपूरसाठी शनिवार व रविवार असे दोन दिवस विशेष रेल्वे धावणार आहे. विशेष रेल्वेची मागणी रेल्वे विभागाकडे काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. ती पूर्ण झाल्याने भक्‍तांना पंढरीला जाणे सोयीचे ठरणार आहे.

दक्षिण-पश्‍चिम रेल्वे विभागाने बेळगावहून पंढरपूरसाठी शनिवार व रविवार असे दोन दिवस विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गाड्या हुबळी-बेळगाव-मिरज-पंढरपूर अशा धावतील. बेळगावातील सिटीझन कौन्सिलने यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली होती. त्यानुसार शनिवार व रविवार असे दोन दिवस विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. यापूर्वीच मध्य रेल्वेने मिरजेहून पंढरपूरला विशेष रेल्वे सुरू केली आहे. हुबळीहून शनिवार आणि रविवारी सकाळी

7 वा. ही रेल्वे सुटणार असून, बेळगावला सकाळी 9.30 वा. पोहोचेल. बेळगावहून ती सकाळी 9.45 वा. सुटणार आहे. दुपारी 12.32 ही रेल्वे मिरजेला पोहोचणार आहे. त्यानंतर पंढरपूरला सायंकाळी साडे चार वाजता पोहोचणार आहे.

पुढच्या दिवशी म्हणजे रविवारी (आणि दुसरी रेल्वे सोमवारी) सकाळी 7.30 वा. पंढरपूरहून निघणार असून, दुपारी 3 वा. बेळगावला पोहोचणार आहे. उत्तर कर्नाटकमधून हजारो भाविक आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जात असतात. या गाडीमुळे भाविकांची चांगली सोय झाली आहे.

Back to top button