बेळगाव : शैक्षणिक गुणवत्तेत बेळगाव जिल्हा देशभरात ‘टॉप टेन’मध्ये | पुढारी

बेळगाव : शैक्षणिक गुणवत्तेत बेळगाव जिल्हा देशभरात ‘टॉप टेन’मध्ये

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बेळगावचे शिक्षण दर्जेदार आहे, हे उभ्या कर्नाटकाला माहीत आहे. आता ते संपूर्ण देशालाही माहीत होईल. कारण शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षकांची उपलब्धता, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, डिजिटल शिक्षण आणि निकाल अशा निकषांवर प्राथमिक शिक्षणात बेळगाव जिल्हा चक्क देशभरातील अव्वल दहा जिल्ह्यांमध्ये (टॉप टेन) समाविष्ट करण्यात आला आहे. राजस्थानचा झुणुझुणु हा जिल्हा पहिल्या स्थानी आहे, तर बेळगाव सहाव्या स्थानी आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने देशभर सर्वेक्षण करून यादी जाहीर केली आहे.

शैक्षणिक कामगिरीनिहाय देशातील जिल्ह्यांची श्रेणी ठरवण्यात आली आहे. त्यानुसार दक्ष (91 ते 100 टक्के गुण), उत्कर्ष (81 ते 90), अति उत्तम (71 ते 80), उत्तम (61 ते 70) असे एकूण 10 गट करण्यात आले आहेत. सर्वांत कमी म्हणजे शून्य ते 10 टक्के गुण मिळवणार्‍या जिल्ह्यांना ‘आकांक्षी’ श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहे. मागास राज्यातील जिल्हे आकांक्षी श्रेणीत समाविष्ट
आहेत. एकूण 290 गुणांपैकी 90 टक्के गुण कुणालाही मिळाले नाहीत. त्यामुळे सर्वोच्च दक्ष या श्रेणीत देशातील एकही जिल्हा समाविष्ट होऊ शकला नाही. मात्र, उत्कर्ष या श्रेणीत राजस्थानमधील तीन जिल्ह्यांचा समावेश आहे.

बेळगावचा समावेश गुणवत्ता अशी ठरली फक्त सरकारी, अनुदानित आणि जिल्हा पंचायतींच्या शाळांचाच विचार गुणवत्ता ठरवण्यासाठी करण्यात आला. त्यामुळे खासगी शाळांचा कुठेच विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे बंगळूरसारखा जिल्हाही शैक्षणिक गुणवत्तेत अव्वल असला तरी तिथल्या बहुतेक दर्जेदार शाळा खासगी आहेत. त्यामुळे बंगळूर, म्हैसूरचा समावेश या यादीत होऊ शकला नाही.

राज्यांची गुणवत्ता

देशभरातील राज्यांच्या यादीतही राजस्थान अव्वल यादीत असून, कर्नाटक दुसर्‍या स्थानी आहे. एकूण 180 पैकी राजस्थानला 168 गुण मिळाले आहेत.

टॉप जिल्हे असे स्थान जिल्हा 291 पैकी गुण

1 झुणुझुणु 236
2. सिकर 228
3 जयपूर 228
4 नागौर 227
5 जगतसिंगपूर 223
6 बेळगाव 219

Back to top button