आषाढात श्रावणाची अनुभूती ; ऊन-पावसाचा रंगला खेळ | पुढारी

आषाढात श्रावणाची अनुभूती ; ऊन-पावसाचा रंगला खेळ

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा मृग नक्षत्र जवळपास कोरडेच गेल्यानंतर आर्द्रा नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. परंतु मागील दोन दिवसांपासून दिवसभर कडक ऊन पडत असून पावसाच्या अधूनमधून हलक्या सरी हजेरी लावत आहेत. परिणामी आषाढ मासामध्ये श्रावण महिन्याची अनुभूती येत आहे.

यावर्षी मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेले. मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली होती. परिणामी मृग नक्षत्र अधिक बरसेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु पावसाने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली. केवळ दोन दिवस मृग नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावली. त्यात शेतकर्‍यांनी पेरणीची कामे उरकून घेतली आहेत. मात्र पीकवाढीसाठी पावसाची प्रतीक्षा आहे.

भातरोप लागवड वगळता शेतीची बहुतांश कामे आटोपली आहेत. पिकांची उगवण होत असून आंतरमशागतीच्या कामांना येत्या काळात वेग येणार आहे. सध्या कोळपणीच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. अशातच आर्द्रा नक्षत्रानेही शेतकर्‍यांची निराशा केली आहे. पावसाच्या प्रतीक्षेकडे तोंड लावून बसलेल्या शेतकर्‍यांना फटका बसला आहे.

सध्या श्रावण महिन्यातील वातावरण पाहावयास मिळत आहे. पावसाच्या हलक्या सरी त्यानंतर कडक उन्हे अशी परिस्थिती दिसून येत आहे. सकाळ आणि संध्याकाळी पाऊस काही प्रमाणात हजेरी लावत आहे. तर दिवसभर कडक ऊन पडत आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शिवारामध्ये अद्याप पाणी जमा झालेले नाही.

संततधार पावसाची प्रतीक्षा

तालुक्यातील बहुतांश भागात भात पेरणीची कामे आटोपली आहेत. येत्या काही दिवसात भात रोपलागवडीच्या कामांना वेग येणार आहे. यासाठी संततधार पावसाची आवश्यकता आहे.

हेही वाचा

Back to top button