कर्नाटक : पोलिस आयुक्‍तालयाचे काम पूर्णत्वाकडे; लवकरच होणार लोकार्पण | पुढारी

कर्नाटक : पोलिस आयुक्‍तालयाचे काम पूर्णत्वाकडे; लवकरच होणार लोकार्पण

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
शहरातील पोलिस आयुक्‍तालयाला लवकर अत्याधुनिक नूतन इमारत मिळणार असून जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रमुखांच्या जुन्या इमारतीमध्ये असणारे आयुक्‍तालय लवकरच नव्या अत्याधुनिक सुविधांनियुक्‍त असणार्‍या इमारतीमध्ये स्थलांतरित होणार आहे. इमारतीचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाला गती देण्यात आली आहे.

कॉलेज रोडवरील पोलिस लाईन, युनियन जिमखानाजवळ असणारी 2 एकर जागा यासाठी मंजूर करण्यात आली आहे. यासाठी 12 कोटी 64 लाख 14 हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कर्नाटक स्टेट हाऊसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या निरीक्षणाखाली काम सुुरु असून बंगळूर येथील आर. एस. कन्स्ट्रक्शनकडून इमारत बांधकाम करण्यात येत आहे. सध्या जवळपास 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. बेसमेंटसह तीन मजली इमारत उभारण्यात आली आहे. 4720 चौरस फूट जागेत इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. उर्वरित जागेत पार्किंग, उद्यान आदी सुविधा उपलब्ध करुन विकास करण्यात येणार आहे.

तत्कालीन गृहमंत्री व मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते डिसेंबर 2020 मध्ये भूमिपूजन करुन शंकुस्थापना करण्यात आली होती. लवकरच काम पूर्ण करुन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे समजते. त्यामुळेच कामाला गती देण्यात आली आहे. अंंतर्गत सौंदर्यीकरण व रंगरंगोटीची काम सुरु आहे.

पोलिस आयुक्‍तालयाला मंजुरी मिळून 8 वर्षाचा कालावधी होत आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी आयुक्‍तालयाची घोषणा करुन 2013?14 मध्ये अर्थसंकल्पात निधीची तरतुद केली होती. विरोधी पक्षनेते सिध्दरामय्या यांनी जिल्हा पोलिस प्रमुखांच्या जुन्या कार्यालयात आयुक्‍तालयाचे 2014 मध्ये उद्घाटन केले होते.

आयुक्तालयाचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. अंतर्गत सजावटीचे काम सुरू असून खिडक्या, दरवाजे, फर्निचर आदी कामे सुरू आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यात काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
-डॉ. एम. बी. बोरलिंगय्या,
पोलिस आयुक्त

Back to top button