ग्राहक मंचसाठी वकिलांचा कामकाजावर बहिष्कार | पुढारी

ग्राहक मंचसाठी वकिलांचा कामकाजावर बहिष्कार

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा :  वारंवार मागणी करूनही राज्य ग्राहक मंचाची (स्टेट कंझ्युमर फोरम) गुलबर्गा येथे सुरू करण्यावर सरकारने शिक्‍कामोर्तब केल्यामुळे वकिलांनी कामकाजावर बहिष्कार टाकून सरकारचा निषेध नोंदवला. ग्राहक मंचासाठी आमचा लढा सुरूच राहील, असा इशारा वकिलांनी जिल्हाधिकार्‍यांकरवी सरकारला दिला.
बेळगाव येथे बार असोसिएशन आणि वकिलांकडून राज्य ग्राहक मंच स्थापन करण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. सुरूवातीपासून सरकारने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरच बेळगावात ग्राहक मंच सुरू करण्यात येईल, असे सांगितले. पण, आता ग्राहक मंच गुलबर्गा येथे सुरू करण्यावर सरकारने शिक्‍कामोर्तब केले आहे. गुलबर्गा येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. तरीही त्याठिकाणी ग्राहक मंच देण्यात आले आहे. हा बेळगाववर अन्याय करणारा निर्णय आहे. बेळगावमध्ये ग्राहक मंच स्थापन न झाल्याच्या विरोधात सकाळीच वकिलांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. राज्य सरकारचा निषेध केला. जिल्ह्यातील अनेक मंत्र्यांनी ग्राहक मंचासाठी प्रयत्न केले नाहीत, असा आरोपही वकिलांनी केला.

न्यायालय आवारात जमून वकिलांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा काढला. राज्य ग्राहक मंचासाठी बेळगाव अनुकूल आहे. गुलबर्गा येथे आवश्यक बाबी नसतानाही त्याठिकाणी मंच सुरू करण्यात येणार आहे. त्याला आमचा विरोध आहे, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांच्या अनुपस्थितीत शिरस्तेदार एस. एम. फरगी यांनी निवेदन स्वीकारले.

यावेळी बार असोसिएशन अध्यक्ष अ‍ॅड. प्रभू यतनट्टी, उपाध्यक्ष अ‍ॅड. सुधीर चव्हाण, अ‍ॅड. सचिन शिवण्णावर, सरचिटणीस अ‍ॅड. गिरिराज पाटील, अ‍ॅड. बंटी कपाई, अ‍ॅड. मारूती कामाण्णाचे आदी उपस्थित होते.

वकील संतापले
राज्य ग्राहक मंच बेळगावऐवजी गुलबर्गा येथे सुरू करण्यास मंजुरी देण्यात आल्यामुळे वकील संतापले होते. निवेदन देण्यासाठी गेलेल्या वकिलांनी जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी स्वत: निवेदन स्वीकारावे, असा आग्रह धरला. पण, जिल्हाधिकारी पाटील निवडणूक कामात असल्यामुळे शिरस्तेदार फगरी यांनी निवेदन स्वीकारले.

ग्राहक संघातर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

ग्राहक मंचची स्थापना बेळगावात करण्यात यावी, अशी मागणी मंगळवारी ग्राहक संघाच्यावतीने करण्यात आली. शिष्टमंडळाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. एन. आर. लातूर यांनी केले.

जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, गेल्या दोन वर्षापासून ग्राहक मंचची स्थापना बेळगावात करण्यात यावी, यासाठी आमचा संघर्ष सुरु आहे. जिल्हा ग्राहक न्यायालयाच्या विरोधात अपिल करताना बंगळूरमध्ये ग्राहकांना जावे लागते. असे असताना हे ग्राहक मंच गुलबर्गा येथे करण्यात आले आहे. ते रद्द करुन तात्काळ बेळगावमध्ये ग्राहक मंच सुरु करण्यात यावे. यावेळी ग्राहक संरक्षण संघाचे सदस्य उपस्थित होते.

Back to top button