वर्षभर कष्ट करणार्‍या बैलांची बेंदूर सणापूरतीच पुजा | पुढारी

वर्षभर कष्ट करणार्‍या बैलांची बेंदूर सणापूरतीच पुजा

निपाणी : पुढारी वृत्तसेवा :  आज सर्वत्र कर्नाटकी बेंदूर सण साजरा होत आहे. वर्षभर कष्ट करणार्‍या बैलांना या दिवशी पुजले जाते. बैलांना विश्रांती देण्याचा दिवस हा बेंदराला असतो. बैलांना सजवून त्यांची पूजा आणि मिरवणूकही काढली जाते. पूर्वी बैलांच्या गर्दीतच बेंदूर जल्‍लोषात साजरा केला जात असे. आता मात्र बैल सणांपुरतेच दिसू लागले आहेत. बैलांची उपयोगिता संपली नसली तरी पशुखाद्य परवडत नसल्याने बैल पाळणे परवडत नाही. वाढते यांत्रिकीकरण आणि खाद्यांचे वाढलेले दर यामुळे बैलांची संख्या कमी कमी होऊ लागली आहे. निपाणी शहरात तर बैलगाड्या अगदी कमी प्रमाणात पाहावयास मिळत आहेत.

बैलगाडीची जागा आता ट्रॅक्टर ट्रॉलीने घेतली आहे. विभक्‍त कुंटूंब पद्धतीमुळे शेतीचे तुकडे झाल्याने शेतकरी अल्पभूधारक होत आहे. याचा परिणाम त्याच्या उत्पन्नावर झाला असून या परिस्थितीत जनावरे पाळणे त्याला अवघड झाले आहे. बैलांना तांबडी कुळीथ, गहू, दूध, गवत, कडबा असे खाद्य व चारा द्यावा लागतो. या खाद्यांचे दर शेतकर्‍यांना परवडणारे नसणारे अनेक शेतकरी बैल पाळण्यापेक्षा ट्रॅक्टर खरेदी करणे पसंत करत आहेत.

बैलजोडीद्वारे दिवसभर होणारी मशागत ट्रॅक्टरने तासाभरात होऊ लागली आहे. त्यामुळे बैल पाळणे, त्यांची सेवा करणे चारा, खाद्यांची बेगमी करणे हे टाळण्यासाठी बैल पाळण्याचे प्रमाण कमी कमी होत आहे. शहरात काही प्रमाणात बैलजोडीचा उपयोग हा काही मंडळी उदरनिर्वाहासाठी करत असल्याचे दिसते. यातून सिमेंट, विटा, सळी व वाळू वाहतूक करून काहीजण संसार चालवित आहेत. तेवढे बैल सोडले तर अन्यत्र बैलजोड्या दिसणे मुश्किल झाले आहे.

शेतीची कामे झटपट आटोपण्याचा प्रयत्न म्हणून यांत्रिकीकरणाद्वारे शेती करण्याकडे कल वाढल्याने गावागावांत ट्रॅक्टर व रोटाव्हेटर दिसू लागले आहेत. काही वर्षापूर्वी गावात एक-दोन ट्रॅक्टर दिसत होते. ते चित्र आता बदलले आहे. सध्या प्रत्येक गावात पाचहून अधिक ट्रॅक्टर दिसत आहेत. काही हौशी मंडळी शर्यतीसाठी बैलजोडी पाळतात. महागाई वाढली असली तरी हौसेपोटी त्यांच्याकडून बैलांचे संगोपन केले जाते.

बैल पाळणे होतेय दुर्मीळ
पूर्वी शेतीकामासाठी बैलजोडीचा सर्रास वापर केला जात होता. त्यावेळी चारा-पाणीही मुबलक होते. त्यामुळे देशी गाईबरोबर म्हैसुरी, माणदेशी, खिलारी व जर्शी गायींची पैदास होत होती. आता चार्‍याअभावी गाय, म्हैशी कसाईखान्यात विकल्या जात आहेत. त्यामुळे शेतीकामासाठी उपयोगी असणारा बैल दुर्मीळ होत चालला आहे. काही ग्रामीण भागात आजही बैलांचे पालनपोषण केले जात आहे. मात्र, अपुर्‍या संख्येमुळे यंत्राद्वारे शेती केली जात आहे.

Back to top button