निपाणी : पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकी बेंदूर सण साजरा होत आहे. यांत्रिकीकरणातही बैलांच्या कष्टाचे महत्त्व टिकून आहे. शेतकर्यांना बेंदूर सणाची उत्सुकता लागून राहिली आहे. शेतकर्यांसह लहान मुलांना बेंदूर सण म्हणजे एक पर्वणीच असते. सणानिमित्त स्वच्छता, रंगरंगोटी, कुंभार बांधवांकडून चिखलाची बैले तयार करण्यासाठी लगबग सुरू आहे.
कर्नाटकात आजही बेंदूर सणाचे महत्त्व टिकून आहे. बेंदूर सण विशेषत: ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लहान-मोठी चिखलाची बैले तयार करुन लहानशी आकर्षक घरेही लहान मुले तयार करत आहेत. मातीच्या बैलांच्या शिंगांना रंग लावण्यासाठी बालचमू एकत्र येत आहेत. पूर्वी गल्लीबोळातील लहान मुले एकत्र येऊन एक गट तयार करुन हाताला कडूलिंबाचा पाला बांधत दोरीने कर तोडणार्या बैलासारखे मान हलवित रस्त्यावरुन धावत सुटायचे. पण, सध्या असे चित्र दुर्मीळ बनत चालले आहे. बेंदूर सणादिवशी करतोडणी पाहण्यासाठी गर्दी होते. शेतकरी नदी, विहिरी, नाल्यावर जाऊन जनावरांना आंघोळ घालत त्यांना सजवितात. बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात येतो. चिखलांच्या बैलांचे घरोघरी पूजन केले जाते. सध्या वाढत्या महागाईमुळे बैलांचा सांभाळ करणेही त्रासाचे होत आहे. त्यामुळे बैलजोडींची संख्या कमी होत आहे.