कर्नाटक : राज्यभरात हाय अलर्ट; मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी घेतली वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची बैठक | पुढारी

कर्नाटक : राज्यभरात हाय अलर्ट; मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी घेतली वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची बैठक

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा

भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर देशात विविध ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभर हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची बैठक घेऊन सूचना दिल्यानंतर अलर्ट जारी करण्यात आला.

राज्यातील अतिसंवेदनशील, संवेदनशील परिसर, मशिदी, मंदिरे आणि प्रमुख देवस्थानांजवळ पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही, तरीही खबरदारी घेण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या सूचनेनंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पोलिस महासंचालक प्रवीण सूद, अतिरिक्‍त पोलिस महासंचालक आलोक कुमार, बंगळूर शहर पोलिस आयुक्‍त प्रताप रेड्डी यांची बैठक घेतली. अतिसंवेदनशील भागांची यादी करून सुरक्षा कडक करण्याच्या सूचना करण्यात आल्या. कोणतीही अनुचित घटना घडल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर राज्यातील संवेदनशील भागात अधिक सुरक्षा पुरवण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांसह राखीव पोलिस दलाच्या तुकड्या ठिकाठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत.

बेळगाव आयुक्‍तालयात तातडीची बैठक

बेळगाव आणि शहर व जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, याची खबरदारी घ्या, असा आदेश राज्याच्या गृह खात्याने बेळगावचे पोलिस आयुक्‍त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या आणि पोलिसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांना दिला आहे. त्यानंतर लगेच बेळगाव शहरातील गस्त वाढवण्यात आली आहे.

भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी महंमद पैगंबरांविषयी केलेल्या वक्‍तव्यामुळे राज्यभर अलर्ट जारी केलेला असतानाच शनिवारी आयुक्‍तालयात विशेष बैठक झाली. राज्याच्या गृह खात्याने आयोजिलेल्या या बैठकीला शहर आणि जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी पोलिस आयुक्‍त कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

बेळगाव जिल्ह्यातही अनेक संघटनांनी नुपूर शर्मा यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. मोर्चे काढून निवेदन देण्यात येत आहे. शुक्रवारी फोर्ट रोडवर नुपूर शर्मा यांचा प्रतीकात्मक पुतळाही लटकवण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर पोलिस खात्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, दंगलीचे लोण पसरू नये याद‍ृष्टीने अधिकार्‍यांनी सतर्क राहावे, असे बजावण्यात आले आहे. जिल्हा पोलिसांनाही सतर्क राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
शनिवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या बेळगाव दौर्‍यानंतर या व्हिडीओ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. डीएसपी, एसीपी, पोलिस निरीक्षक आदी अधिकारी सहभागी झाले होते.

Back to top button