बेळगाव : तालुक्यात काजू विक्रीअभावी पडून ; कमी दरामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत | पुढारी

बेळगाव : तालुक्यात काजू विक्रीअभावी पडून ; कमी दरामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
काजू व्यापार्‍यांकडून काजूचे दर कमी करण्यात आल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अनेक गावांतून अद्याप काजूची विक्री करण्यात आली नसून हजारो टन काजू शेतकर्‍यांच्या घरातून पडून आहे. शेतकरी दरवाढीची प्रतीक्षा करत आहेत. सध्या काजू व्यापार्‍यांकडून 110 ते 115 रु. किलो दराने काजू खरेदी करण्यात येत आहे. यावर्षी काजूचे उत्पादन घटल्याने अधिक दर मिळेल, असा अंदाज शेतकर्‍यांतून वर्तवण्यात येत होता. परंतु सारे अंदाज फोल ठरले असून व्यापार्‍यांकडून अत्यल्प दरात काजू खरेदी केली जात आहे. परिणामी शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसत असून नुकसान सहन करावे लागत आहे.

यावर्षी प्रतिकूल हवामानामुळे काजू उत्पादन निम्म्याहून अधिक प्रमाणात कमी झाले आहे. उत्पादित काजूही चांगल्या दर्जाची नाही. काजूवर डाग पडले आहेत. परिणामी काजूला मागणी कमी झाली आहे. सध्या गावागावांतून व्यापार्‍यांकडून काजू खरेदी सुरू करण्यात आली आहे. परंतु व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांना कमी दर देण्यात येत आहे. चंदगड भागात 120 रु. पर्यंत काजू खरेदी करण्यात येत आहे. त्याच व्यापार्‍यांकडून बेळगाव तालुक्यात 115 रु. पर्यंत काजू खरेदी करण्यात येत आहे.

तुडये येथे झालेल्या काजू उत्पादक संघर्ष समितीच्या बैठकीत किमान दर 135 रु. इतका देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शेतकर्‍यांनी काजू सुकवून साठा करण्याचे आवाहन केले आहे. परंतु शेतकर्‍यांना पेरणीच्यावेळी अनेक गरजा असल्याने बहुतांश शेतकरी विक्री करण्याचा प्रयत्न करत आहेत.

एपीएमसीचे दुर्लक्ष

गावागावांतून अनेक व्यापारी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून मनमानी पद्धतीने काजू खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर वजनकाट्याबाबत साशंकता दिसून येत आहे. या प्रकाराकडे एपीएमसी अधिकार्‍यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

Back to top button