बेळगाव : ‘एक मराठा, लाख मराठा’सारखा विराट मोर्चा काढू | पुढारी

बेळगाव : ‘एक मराठा, लाख मराठा’सारखा विराट मोर्चा काढू

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : ज्या मराठी भाषेसाठी 9 जणांनी हौतात्म्य पत्करले, कन्नडसक्ती विरोधात लढा दिला, ती कन्नडसक्ती अजूनही दूर झालेली नाही. कर्नाटक सरकार गेल्या 18 वर्षांपासून स्वत:च्याच कायद्याची अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे 1 जून हुतात्मा दिनी हुतात्म्यांना अभिवादन करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतरही मराठी कागदपत्रे देण्यात येत नसतील तर ‘एक मराठा, लाख मराठा’च्या धर्तीवर विराट मोर्चा काढून मराठीची ताकद दाखवून देण्यात येईल, असा इशारा शहर म. ए. समितीच्या बैठकीत देण्यात आला.

रामलिंगखिंड गल्ली येथील रंगुबाई भोसले पॅलेस या कार्यालयात सोमवारी शहर समितीची बैठक अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

दीपक दळवी म्हणाले, कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात पोलिसांनी घराघरांत घुसून मारहाण केली आहे. हुतात्मा विद्या शिंदोळकर या बालिकेला निर्घृण मारहाण करण्यात आली. एका अर्थाने तिचा खूनच करण्यात आला. छत्रपती शिवरायांची प्रतिमा उचलणार्‍या आजीला अमानूष मारहाण करण्यात आली. मराठी भाषेसाठी हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे त्यांचा स्वाभीमान आमच्यात अंगिकारणे आमचे कर्तव्य आहे.

मराठी कागदपत्रांसाठी माजी आमदार मनोहर किणेकर यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. निकाल आपल्या बाजुला लागला तरी गेल्या 18 वर्षांपासून कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही. त्यामुळे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी 1 जून रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यावेळी प्रसंगी आम्ही एक मराठा, लाख मराठाच्या धर्तीवर विराट मोर्चा काढून आमची ताकद दाखवू, असा प्रशासनाला इशारा देण्यात येणार आहे.

जयंत पाटील यांची सीमाप्रश्नाशी जवळीक

दळवी म्हणाले, महाराष्ट्र सरकारने तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या जागी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची निवड केली आहे. मंत्री पाटील यांना सीमाप्रश्नाबाबत आपुलकी आहे. जवळीक असलेले मंत्री आम्हाला लाभले असल्यामुळे येत्या काळात लढ्याला चालना मिळेल. शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांच्यावरही आमची जबाबदारी सोपवली आहे. आम्ही प्रश्नाशी प्रामाणिक राहून लढा यशस्वी करायचा आहे.

प्रकाश मरगाळे म्हणाले, आजपर्यंत अनेकांनी चुका केल्या आहेत. पण, आता कुणाच्या चुका उगाळण्याची वेळ नाही. जो समितीशी प्रामाणिक आहे, त्यांनीच काम करावे. म. ए. समितीची 150 जणांची कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येईल.

यावेळी मदन बामणे, महादेव पाटील, रणजित हावळाण्णाचे, मोतेस बारदेसकर, सागर पाटील, अमित देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. रणजीत चव्हाण?पाटील यांनी प्रास्ताविक केले. बुधवारी (दि. 1) सकाळी 8.30 वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाजवळ उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी सरचिटणीस मालोजी अष्टेकर, रामा शिंदोळकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, नगरसेविका वैशाली भातकांडे, एपीएमसी माजी सदस्य महेश जुवेकर, गणेश दड्डीकर, शिवानी पाटील, युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, विश्वनाथ सूर्यवंशी, विकास कलघटगी, श्रीकांत कदम, संतोष कृष्णाचे, बाबू कोले आदी उपस्थित होते.

मराठीवर दबाब आणून पक्षांतर

म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणून त्यांचे भाजपमध्ये पक्षांतर करण्यात येत आहे. विविध गुन्ह्यांत अडकविण्यात येईल, अशी धमकी देण्यात येत आहे. त्यामुळे म. ए. समितीने असे प्रकार रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

मराठीवर दबाब आणून पक्षांतर

म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणून त्यांचे भाजपमध्ये पक्षांतर करण्यात येत आहे. विविध गुन्ह्यांत अडकविण्यात येईल, अशी धमकी देण्यात येत आहे. त्यामुळे म. ए. समितीने असे प्रकार रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

Back to top button