बेळगाव : शिवसेना गांभीर्याने पाळणार हुतात्मा दिन | पुढारी

बेळगाव : शिवसेना गांभीर्याने पाळणार हुतात्मा दिन

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना बेळगाव जिल्हा सीमाभाग यांच्यावतीने येत्या बुधवारी दि. 1 जून रोजी हुतात्मा दिन साजरा करण्यात येणार आहे. हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे सकाळी 9 वाजता अभिवादन करण्यात येईल. कन्नड सक्ती विरोधातील 1986 च्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांकरिता हा दिन साजरा केला जातो.

हुतात्मा अभिवादन कार्यक्रमासंदर्भात बेळगाव शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक आज (सोमवारी) समर्थनगर बेळगाव येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवसेना बेळगाव उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर हे होते. सीमाप्रश्नासाठी शिवसेना नेहमीच अग्रेसर असते. या लढ्यामध्ये सक्रिय होणे हे सर्व मराठी बांधवांचे कर्तव्य आहे. मराठी युवकांना एकत्र करण्यासाठी या हुतात्म्यांनी हौतात्म्य पत्करून सर्वांना एक कानमंत्र दिला आहे. सीमाप्रश्न सुटेपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही, असे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर बैठकीत बोलताना म्हणाले.

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख सचिन गोरले, उपशहरप्रमुख राजू तुडयेकर, प्रवीण तेजम, राजकुमार बोकडे, प्रकाश राऊत राजू कणेरी, महिपाल इतापाचे, विनायक जाधव आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याबरोबरच येत्या 1 जून रोजी हुतात्मा स्मारक, हिंडलगा येथे होणाऱ्या अभिवादनाच्या कार्यक्रमास बेळगाव शहरासह सीमाभागातील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने हजर रहावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

हेही वाचा

Back to top button