कर्नाटक : डी. के. शिवकुमारांविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र दाखल | पुढारी

कर्नाटक : डी. के. शिवकुमारांविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र दाखल

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप असणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, त्यांचे बंधू डी. के. सुरेश तसेच इतरांविरुद्ध सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्ली न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. शिवकुमार यांच्या कुटुंबाविरुद्ध 800 कोटींची बेकायदा मालमत्ता असल्याचा आरोप करण्यात आला. प्रत्यक्षात 8.59 कोटींच्या मालमत्ताच अनधिकृत असल्याचे दिसून आले आहे.

बेकायदा व्यवहाराच्या आरोपावरुन शिवकुमार यांना 2019 मध्ये अटक करण्यात आली होती. 45 दिवस त्यांना तिहार कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना दिल्ली न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. शिवकुमार यांच्यावर 800 कोटींची बेनामी मालमत्ता जमवल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी ईडीने 2 ऑगस्ट 2017 रोजी छापा टाकला होता. त्यावेळी एकूण 143 कोटींची बेनामी मालमत्ता सापडली होती. त्यांच्या कुटुंबियांच्या नावे 200 कोटींच्या ठेवी सापडल्या होत्या. 20 पेक्षा अधिक बँकांमध्ये 317 खाती असल्याचे तपासात दिसून आले होते. शिवकुमार यांच्या मुलीच्या नावे 108 कोटींचा व्यवहार झाला होता.

मुलीच्या नावे 48 कोटींचे कर्ज असल्याची कागदपत्रे सापडली होती. पण, कर्ज कोणत्या आधारे घेतले याची माहिती देण्यात आली नव्हती. दिल्लीतील निवासात 8.59 कोटींची रोकड सापडली होती. डीकेशि यांच्या नावे 24, भावाच्या नावे 27, आईच्या नावे 38 अशी एकूण 300 कोटींची मालमत्ता त्यांच्या नावे आहे. बेकायदा मालमत्ता आणि बेकायदा व्यवहार प्रकरणी ईडीने तपास केला. या तपासाअंती आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली. त्यानंतर ईडीने 8.59 कोटी रुपये अनधिकृत असल्याचे सांगितले.

Back to top button