गोवा : टोमॅटो का रुसला? वाहतूक खर्च ग्राहकांच्या माथी | पुढारी

गोवा : टोमॅटो का रुसला? वाहतूक खर्च ग्राहकांच्या माथी

पणजी : पुढारी वृत्तसेवा
बेळगाव बाजारातून राज्यात भाजीपाला येतो. त्यातील एक घटक म्हणजेच टोमॅटो तेथील स्थानिक बाजारपेठेत किरकोळ विक्रेत्यांकडे 80 रुपये किलो विकला जात आहे. परंतु, तोच टोमॅटो गोव्यात येईपर्यंत 20 रुपयांनी वाढवून म्हणजेच 100 रुपये किलोने ग्राहकांच्या माथी मारला जात आहे. म्हणजे सुमारे 20 ते 25 रुपये वाहतूक खर्च

ग्राहकांच्या खिशातून पद्धतशीरपणे काढले जात असल्याचे दिसून येते. भाजीपाला असो की कडधान्य यांच्यावर वस्तू सेवा कर काही लागू नाही. आणि त्यांच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारची कोणतीही यंत्रणा निर्माण झालेली नाही. राज्यात फलोत्पादन महामंडळ दररोज बेळगावच्या घाऊक बाजारातून सुमारे तीस ते चाळीस टन भाजीपाला उचलते. तर त्याच्या दुप्पट भाजीपाला खुल्या बाजारात विक्रीसाठी येतो. यातील बहुतांश भाजीपाला वाहतूक खर्च कमी व्हावा म्हणून खरेदीदार रेल्वेमार्गे आणतात. वास्कोतून तो भाजीपाला आणून येथील किरकोळ विक्रेत्यांना ते विकतात. बेळगाव बाजारात जर टोमॅटोचा किरकोळ विक्रीचा दर 80 रुपये असेल, तर तेथील किरकोळ विक्रेत्यांना तो टोमॅटो किमान 70 ते 75 रुपये प्रतिकिलो मिळत असणार आहे.

गोव्यात जर टोमॅटो 100 रुपये विकला जात असल्यामागे बेळगावातील आवक कमी झाल्याचे कारण सांगितले जात आहे. परंतु बेळगावात जरी आवक कमी झाली असली तरी त्याचा दरात एवढ्या मोठ्या प्रमाणात तफावत दिसता कामा नये. नफा मिळविण्याच्या फंद्याने दलाली मोठ्या प्रमाणात मिळविली जात आहे, असे दिसते. त्यामुळेच 20 रुपयांचा खर्च ग्राहकांच्या माथी मारला जात आहे.
टोमॅटो वाढीव दराचे कारण आवक कमी झाली असली तरी सर्व किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांकडे टोमॅटो मोठ्याप्रमाणात विक्रीस कसा, असाही सवाल उपस्थित होतो आहे. वाहतूक दर अगदी प्रति किलोमागे पाच रुपये धरला तरी तो घाऊक व्यापार्‍याला परवडू शकतो, पण तसे होताना दिसत नाही. घाऊक व्यापार्‍याकडून तो खरेदी करून तो किरकोळ विक्रेते विकतात.

बेळगावातच आवक कमी

अवकाळीमुळे कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवरील टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम झाला. पावसाचा मार बसलेला टोमॅटो बाजारात कडक दिसत असला तरी काही तासांनी तो कडकपणा सोडत असल्याचे विक्रेते सांगतात. बेळगावच्या बाजारात चिकमंगळुरचा टोमॅटो ज्या परिमाणात आवक होत होता, तो झाला नाही. त्यामुळे जागीच खरेदीदर चांगला मिळत असेल, तर घाऊक व्यापारीही गोव्यातील व्यापार्‍यांना तो देताना कमी प्रमाणात देतात, असे येथील विक्रेत्यांचे मत आहे.

Back to top button