बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
कणबर्गी निवासी वसाहत योजना क्रमांक 61 गेल्या काही वर्षांपासून रखडली आहे. या योजनेला अद्यापही सरकारची मंजुरी मिळाली नसल्यामुळे बुडासाठी (बेळगाव नगरविकास प्राधिकरण) डोकेदुखी बनली आहे. त्यामुळे मंजुरीसाठी आता अधिकारी वर्गाची धावाधाव सुरू झाली असून बुधवारी (दि. 18) आमदार अनिल बेनके, अध्यक्ष संजय बेळगावकर यांच्यासह अधिकारी वर्ग बंगळूरला रवाना झाले आहेत.
कणबर्गी योजनेसाठी बुडा आणि जिल्हा प्रशासन सुरवातीपासून आग्रही आहे. पण, योजनेत शेती जाणार्या काही शेतकर्यांनी विरोध केला. त्यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश मिळवला. स्थगिती उठवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. पण, यश आले नाही. त्यामुळे अखेर ज्या शेतकर्यांनी जागेची संमती दिली आहे. त्या ठिकाणी 50:50 तत्वावर योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार काम सुरू झाले. जागेचा ताबा घेवून सपाटीकरण करण्यात आले. त्यामुळे शेतकर्यांना योजना लवकर सुरू होईल, असे वाटत होते. पण, राज्याच्या मंत्रीमंडळाची अद्याप या योजनेला मंजुरीच मिळाली नाही. त्यामुळे जमीन दिलेल्या शेतकर्यांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
एकतर योजना राबवा, अन्यथा आमच्या जमिनी परत द्या. गेल्या दहा वर्षांत झालेल्या नुकसानीची भरपाई द्या, असा इशारा शेतकर्यांकडून बुडाला देण्यात येत आहे. मंत्रीमंडळाच्या गेल्या बैठकीत या योजनेला मंजुरी मिळेल, अशी आशा होती. पण, योजनेला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे शेतकर्यांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या योजनेला मंजुरी मिळावी, यासाठी आता अधिकारी वर्गाची धावाधाव सुरू झाली आहे. मंजुरी मिळवण्यासाठी आणि कागदोपत्री कामकाज पूर्ण करण्यासाठी आमदार अनिल बेनके, अध्यक्ष संजय बेळगावकर, आयुक्त प्रीतम नसलापुरे यांच्यासह अधिकारी वर्ग बंगळूरला रवाना झाले आहेत. गुरुवारी (दि. 19) ते नगरविकास मंत्री भैरती बसवराज यांची भेट घेणार आहेत, असे समजते.