कर्नाटक : अथणी तहसीलवर एसीबी छापा | पुढारी

कर्नाटक : अथणी तहसीलवर एसीबी छापा

अथणी (कर्नाटक) : पुढारी वृत्तसेवा
सर्वसामान्य जनतेची शासकीय कामे करण्यास विलंब लावण्यासह महत्त्वाची कागदपत्रे देण्यास विलंब होत असल्याने आलेल्या तक्रारीनुसार भ्रष्टाचार निर्मूलन खात्याच्या पथकाने अथणी तहसीलदार कार्यालयावर सोमवारी छापा टाकून चौकशी केली.
उत्तर विभाग भ्रष्टाचार निर्मूलन खात्याचे पोलिसप्रमुख बी. एस. नेमगोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे उपविभागीय पोलिसप्रमुख करुणाकरशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पथकातील उपनिरीक्षक ए. एस. गुदगेपा, विजापूर, बागलकोट व गदग जिल्ह्यातील भ्रष्टाचार निर्मूलन पथकाचे उपविभागीय पोलिसप्रमुख, उपनिरीक्षकांच्या पथकाने हा छापा टाकला.

सर्वसामान्य जनतेसाठी लागणार्‍या शासकीय महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी लाच स्वीकारली जात असल्याच्या अनेक तक्रारी भ्रष्टाचार निर्मूलन खात्याकडे आल्यामुळे सोमवारी भ्रष्टाचार निर्मूलन खात्याच्या पथकाने छापा टाकून तपास सुरू ठेवला आहे. सुमारे 50 अधिकार्‍यांनी अथणी तहसीलदार कार्यालयाची चौकशी चालवली आहे. कार्यालयातील अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांची पडताळणी करत तहसीलदार दुंडाप्पा कोमार व अधिकार्‍यांची चौकशी केली.

सर्वसामान्य जनतेतून समाधान

अथणी तहसील कार्यालयात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींची दखल घेत भ्रष्टाचार निर्मूलन पथकाने छापा टाकल्याने सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. कार्यालयात अनेक अधिकारी सरळसरळ लाच स्वीकारत असून, काहीजण एजंटांतर्फे लाच स्वीकारत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या.

Back to top button