वायव्य शिक्षक मतदार संघातून काँग्रेसची प्रकाश हुक्केरींना उमेदवारी जाहीर | पुढारी

वायव्य शिक्षक मतदार संघातून काँग्रेसची प्रकाश हुक्केरींना उमेदवारी जाहीर

चिकोडी (जि. बेळगाव) : काशिनाथ सुळकुडे

आगामी विधान परिषदेच्या वायव्य शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज दिल्ली येथेल अखिल भारतीय काँग्रेस समितीचे मुख्य सचिव मुकुल वासनिक यांनी त्यांच्या नावाची अधिकृतरित्या घोषणा केली. काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हुक्केरी यांची निवड केल्याचे वासनिक यांनी सांगितले.

वासनिक म्हणाले, प्रकाश हुक्केरी मागील तीस वर्षापासून काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य, विधान परिषद सदस्य, पाच वेळा आमदार, तीन वेळा मंत्री व एकदा खासदार म्हणून काम केले आहे. एक कार्यक्षम व सर्वसामान्यांसाठी काम करणारा नेता, आपल्या मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकासकामे राबवून मतदारसंघाचा कायापालट करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. यामुळे काँग्रेस पक्षाने तुल्यबळ असा उमेदवार दिला आहे, असे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे भाजपाकडून वायव्य शिक्षक मतदार संघाचे विद्यमान विधान परिषद सदस्य अरुण शहापूर यांना उमेदवारी दिली जाणार आहे. यामुळे हुक्केरी आणि शहापूर यांच्यात जंगी लढत होणार आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर खासदार प्रकाश हूकेरी यांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी देण्याची मागणी होत होती. तसेच अलीकडे झालेल्या बेळगाव लोकसभा व विधानपरीषदेची उमेदवारी खासदार प्रकाश हुकेरीना देण्याची मागणी होती. पण पक्षाकडून दुसऱ्यांना उमेदवारी दिल्याने सामान्य कार्यकर्ते नाराज होते.

पण आता आगामी वायव्य शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी प्रकाश हूकेरीना दिल्याने कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. प्रकाश हूकेरी यांनी मागील तीन महिन्यांपासून या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. अनेक शिक्षक मतदारांच्या बैठक घेऊन प्रचाराचा नारळ फोडला आहे.

Back to top button