बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
उन्हाच्या तडाख्याबरोबरच राजकीय वातावरणही तापू लागले आहे. पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे बेळगाव ग्रामीण मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपने आतापासून वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मराठी भाषिकांचे प्रश्न घेऊन लढा देणारी महाराष्ट्र एकीकरण समिती मात्र अद्याप हालचाल करताना दिसत नाही. त्यामुळे काही प्रमाणात कार्यकर्त्यांत नाराजी दिसून येत आहे.
गतवर्षी महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा प्रशासन आणि कन्नडिग गुंडांकडून उधळून लावण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अवमानाविरोधात आंदोलन करणार्या मराठी भाषिक नेते आणि कार्यकर्त्यांवर राजद्रोह आणि खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे घातले. तब्बल 47 दिवस कारागृहात काढावे लागले. या सार्या प्रकारामुळे लोकांत तीव्र संताप दिसून आला. पण, याचा महाराष्ट्र एकीकरण समितीने म्हणावा तसा राजकीय वातावरणासाठी लाभ घेतलेला नाही. दुसरीकडे काँग्रेसने सदस्य नोंदणी मोहीम सुरू केली आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दुसर्या फळीतील नेत्यांनाच टार्गेट करण्यात येत आहे. समितीला आतून पोखरण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विविध मेळावा, स्पर्धांच्या माध्यमातून काँग्रेस पुन्हा मतदारसंघात बांधणी करण्याचा प्रयत्न करत आहे.
भाजपकडूनही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युवकांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय मराठी मतदारांना एकगठ्ठा करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. मराठा कार्डही खेळण्यात येत आहे. भाजपने या मतदारसंघात दहा वर्षे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यामुळे हातातून गेलेला गड घेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीत एकी झाल्यामुळे चांगले वातावरण आहे. पण, ठोस कार्यक्रम राबवण्यात आला नसल्यामुळे कार्यकर्त्यांत काही प्रमाणात चुळबूळ आहे. अनेक गावांत काही नेते भेट देत असले तरी एकीच्या बळावर ज्या प्रमाणात ताकद दिसायला हवी, तसी दिसत नाही. त्यामुळे अनेकांतून आतापासून विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी म. ए. समिती युवा आघाडीने पुढाकार घेणे आवश्यक आहे. युवकांची मोट बांधून आगामी निवडणुकांची तयारी होणे गरजेचे आहे. त्यासाठी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. युवा वर्गाच्या जोरावर मतदारसंघात वातावरण निर्मिती वेगाने होण्यास मदत होणार आहे.