बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थान कटल्याचे आगमन होणार आहे. दुपारी चार वाजता समादेवी मंदिरापासून वाजत गाजत ढोल ताशांच्या मिरवणुकीत तसेच गुलालाच्या उधळणीत कटल्याचे आगमन होणार असून, येथील मंदिरात औक्षण करून पूजन करण्यात येणार आहे.
तसेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर येथील मंदिरात ज्योतिबा देवाला अभिषेक करून पालखी पूजन करण्यात येणार आहे. तसेच आरती करुन तीर्थ प्रसादाचे वाटपही करण्यात येणार आहे.
सालाबाद प्रमाणे नार्वेकर गल्ली बेळगाव येथून पायी जाणारे भक्त पालखी व बैलगाड्याने गुरुवार दिनांक 7 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 वाजता नार्वेकर गल्ली ज्योतिर्लिंग देवस्थान येथून निघणार आहेत.
तसेच हेब्बाळ, संकेश्वर, निपाणी, कागल, कोल्हापूर येथे वस्ती करून मंगळवार दिनांक 12 एप्रिल रोजी जोतिबा डोंगरावर पोहोचणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक 15 एप्रिल रोजी रात्री दवणा आणि शनिवार दिनांक 16 एप्रिल रोजी पालखी (सबीणा )सोहळा होणार आहे. तसेच परत माघारी गुरुवार दिनांक 21 एप्रिल रोजी कोल्हापूर सर्कल बेळगाव येथे आंबील घुगऱ्याची जत्रा करून पालखी नार्वेकर गल्ली बेळगाव येथे पोहोचणार आहे. याची बेळगाव परिसरातील सर्व ज्योतिबा भक्तांनी नोंद घ्यावी असे कळविण्यात आले आहे.