बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
उद्योजक आर. एन. नाईक खूनप्रकरणात कुख्यात सुपारी किलर बन्नंजे राजासह 9 जणांना न्यायालयाने बुधवारी दोषी ठरवले असून 4 एप्रिल रोजी त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. कोक्का (कर्नाटक कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज्ड क्राईम अॅक्ट अर्थात् संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) अंतर्गत दाखल झालेला राज्यातील हा पहिला खटला असून दोषींना देण्यात येणार्या शिक्षेचे स्वरूप काय असणार, याकडे लोकांचे लक्ष लागून आहे. तिघा संशयितांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
कोक्का न्यायालयाचे न्यायाधीश सी. एम. जोशी यांनी दिलेल्या आदेशानुसार टोळीप्रमुख बन्नंजे राजा (उडुपी), जगदीश पटेल (उत्तर प्रदेश), अभी बंडगार (बंगळूर), गणेश बजंत्री (उडुपी), के. एम. इस्माईल (केरळ), महेश अच्चंगी (हासन), संतोष एम. बी. (केरळ), जगदीश चंद्रराज (बंगळूर), अंकितकुमार कश्यप (उत्तर प्रदेश) हे दोषी ठरले आहेत. तर रबीन पिचई (केरळ), महंमद शहाबंदर (बंगळूर) आणि अनंत नाईक (कारवार) हे निर्दोष ठरले आहेत. एकूण 16 जणांवर खुनाचा आरोप होता. त्यापैकी तिघे बेपत्ता असून एका संशयिताचा मृत्यू झाला आहे.
कारवार जिल्ह्यात सहकार आणि शिक्षण क्षेत्रात आर. एन. नाईक कार्यरत होते. ते बडे प्रस्थ असल्यामुळे विदेशात बसून बन्नंजे राजा त्यांना टार्गेट करत होता. त्यांच्याकडे तीन कोटी रुपयांच्या खंडणीचा तगादा लावण्यात आला होता. खंडणी देण्यास टाळाटाळ केल्यामुळे बन्नंजे राजाने त्यांच्या खुनाचा कट रचला. 21 डिसेंबर 2013 रोजी उत्तर प्रदेशचा शार्पशूटर विवेक उपाध्याय याने नाईक यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा खून केला. यावेळी पान 2 वरनायक यांचा गनमॅन असलेल्या रमेश गौडा याच्यावरही गोळीबार करून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
नाईक यांच्या खूनानंतर दुसर्या दिवशी बन्नंजे राजा याने काही प्रसारमाध्यमांना फोन करून आपणच नाईक यांचा खून करण्याचा आदेश दिला होता, असे सांगितले होते. त्यानंतर पश्चिम परिक्षेत्र पोलिस संचालकांच्या सूचनेनुसार या प्रकरणी कोक्कांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकूण 13 जणांना अटक करण्यात आली होती.
विदेशात बसून गुन्हेगारीची सूत्रे हाताळणार्या बन्नंजे राजाला 12 फेब्रुवारी 2015 रोजी मोरोक्को येथे बनावट पासपोर्ट वापरल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्यावर खंडणी, खून आणि बलात्कारासह 44 खटले दाखल होते. त्यामुळे इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. मोरोक्कोत अटक केल्यानंतर केंद्र सरकारच्या विनंतीकरून मोरोक्को सरकारने त्याला कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात दिले होते. 14 ऑगस्ट 2015 रोजी बन्नंजे राजाला बेळगावातील कोक्का न्यायालयात पहिल्यांदा हजर करण्यात आले.
उद्योजक नाईक खून खटला कोक्का न्यायालयात सात वर्षे चालला. या प्रकरणात वरिष्ठ पोलिस अधिकारी भास्कर राव, अण्णामलाई, प्रताप रेड्डी, अलोक कुमार यांच्यासह 210 जणांची साक्ष नोंदवण्यात आली. 1027 दाखले आणि 138 मुद्देमाल तपासण्यात आले. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील अॅड. के. जी. पुराणिकमठ आणि अॅड. शिवप्रसाद अल्वा यांनी काम पाहिले.
बन्नंजे राजासह सर्व संशयितांना हिंडलगा कारागृहात ठेवण्यात आले होते. दुपारी 12.30 वाजता त्यांना कोक्का न्यायालयात आणण्यात आले. अडीच वाजता दोन्ही बाजुचे युक्तिवाद झाल्यानंतर न्यायाधीश सी. एम. जोशी यांनी नऊ जणांना दोषी आणि तिघांना निर्दोष आदेश बजावला. हा निकाल ऐकण्यासाठी न्यायालय आवारात गर्दी होती. पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.