

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
सध्याच्या पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढला असून, त्याला पर्यायी महामार्गाची लवकरच निर्मिती करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. मात्र या महामार्गातून बेळगाव वगळण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच बेळगाव रिंगरोडसह जिल्ह्यातील 12 राज्यमार्गांनाही मंजुरी दिल्याची घोषणा करतानाच, 2024 पर्यंत देशातील महामार्ग अमेरिकेच्या तोडीचे बनवू, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला. काकतीमध्ये महामार्ग ओलांडताना अनेक अपघात होत असून, तेथे फ्लायओव्हर बांधण्याची घोषणाही त्यांनी केली.
जिल्ह्यात 3 हजार 972 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणार्या 238 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांच्या पाच प्रकल्पांचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी येथील जिल्हा क्रीडांगणावर झाले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, खासदार मंगल अंगडी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, मंत्री शशिकला जोल्ले, माजी खासदार
डॉ. प्रभाकर कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गडकरी म्हणाले, पुणे- बंगळूर रोडवर सध्या रहदारीचा ताण वाढला आहे. यामुळे पर्यायी महामार्ग बांधण्यात येईल. मात्र हा महामार्ग शहराच्या बाहेरून काढण्यात येणार आहे. त्याच्या आराखड्याचे नियोजन सुरु आहे. मात्र तो बेळगाव आणि कोल्हापूर शहरांच्या बाहेरून जाईल.
बेळगावभोवती करण्यात येणार्या रिंगरोडसह बारा राज्यमार्गांना मंजुरी दिल्याची घोषणा गडकरींनी केली. ते म्हणाले, बेळगाव शहरासभोवतालचा रिंगरोड मार्गी लावण्यात येईल. काकती जवळील उड्डाण पुलाला झालेला विरोध अडचणीचा आहे. अडचण दूर होताच उड्डाणपूलालाही मंजूरी देऊ. भारतमाला-2 योजनेअंतर्गत बेळगाव जिल्ह्यातील खानापूर, पाच्छापूर, रायबाग, चिंचली, जांबोटी, चिखलगुड, मंगसुळीसह एकूण 12 राज्य महामार्गांच्या रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात येईल.
खानापूर ते गोवा महामार्गाचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. नजीकच्या काळात लवकरच या रस्त्याचे उद्घाटन करण्यात येईल. पाच नव्या रस्ते प्रकल्पांतर्गत हाती घेण्यात आलेल्या कामांमुळे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आदी तीन राज्यातील दळणवळण सोयीचे होणार आहे. रस्त्यामुळेच सर्वांगीण विकास शक्य आहे. अनेक धार्मिक आणि पर्यटन स्थळे जोडण्यात येणार आहेत. आपल्या मंत्रालयाकडे निधीची कमतरता नाही त्यामुळे हाती घेण्यात येणारी कामे निश्चितच पूर्ण केले जातील.
देशातील महामार्ग 2024 पर्यंत अमेरिकेच्या तोडीचे करण्यात येतील. कर्नाटकनेही यासाठी आवश्यक तेव्हा भूसंपादन करुन यामध्ये वाटा उचलावा.
मुख्यमंत्री बोम्मई, केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी, कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाममंत्री सी. सी. पाटील, जलसंपदा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ, अन्नधान्य आणि वनमंत्री उमेश कत्ती आदींनी मनोगत व्यक्त केले.
खा. इराण्णा कडाडी, खा. रमेश जिगजीनगी, माजी खा. प्रभाकर कोरे, आ. अभय पाटील, आ. अनिल बेनके, आ. आनंद मामणी, आ. महेश कुमठळ्ळी, आ. पी राजीव, आदी उपस्थित होते.