पारंपरिक शिवजयंतीपूर्वी तरी बसावा मणगुत्तीत शिवपुतळा | पुढारी

पारंपरिक शिवजयंतीपूर्वी तरी बसावा मणगुत्तीत शिवपुतळा

मणगुत्ती : जितेंद्र शिंदे

4 ऑगस्ट 2020 रोजी चबुतर्‍यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा रातोरात उतरवण्यात आला… पुढचे चार दिवस गावात सीमाभागातील शिवप्रेमी एकवटले… अखेर गावपातळीवरच तोडगा काढण्याचा निर्णय झाला…केवळ छत्रपती शिवराय नव्हे तर एका ठिकाणी पाच पुतळे उभारण्याचा निर्णय झाला… पुढे पाचवरून तीन पुतळे झाले.. त्यालाही शिवप्रेमींनी त्याला मंजुरी दिली… पण या घटनेला दीड वर्ष लोटले तरी छत्रपती शिवरायांचा पुतळा अद्याप प्लास्टिकमध्ये गुंडाळून चावडीत ठेवण्यात आला आहे. तो चबुतर्‍यावर कधी प्रतिष्ठापित करण्यात येणार, याबाबत शिवप्रेमींचा सवाल मात्र अजूनही कायम आहे.

ही घटना आहे बेळगावपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या हुक्केरी तालुक्यातील मणगुत्ती गावातील. येत्या एप्रिल-मे महिन्यात बेळगावात पारंपरिक शिवजयंती साजरी होते. त्यापूर्वी तरी मणगुत्तीत शिवपुतळ्याचा प्रतिष्ठापणा व्हावी, ही अपेक्षा आहे.

अनेक वर्षे सामाजिक सलोखा राखत एकोप्याने नांदत असलेल्या या गावात 2020 साली छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यावरून फूट पडली. त्यात लोकांचा सहभाग कमी आणि राजकारण्यांचा भरणा अधिक होता, आजही तीच गत आहे. मणगुत्ती येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास काहींनी विरोध केला. काहींनी त्याला मराठीकन्‍नड अशा भाषिक वादाचे स्वरूप दिले. राजकारण्यांची त्यावर पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दीड वर्षांपासून गावातील चावडीत प्लास्टिमध्ये गुंडाळून ठेवण्यात आला.

स्थानिक आमदार सतीश जारकीहोळी यांनी या वादावर तोडगा काढण्यासाठी गावात इतर समाजाचेही पुतळे उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार छत्रपती शिवरायांबरोबर महर्षी वाल्मिकी, बसवेश्‍वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि श्रीकृष्णाचा पुतळा बसवण्यात येणार होता. पण, त्यानंतर बसवेश्‍वर आणि श्रीकृष्णाचा पुतळा बसवण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. समाजाच्या वरिष्ठांनी तो निर्णय घेतला. पण, इतर तीन पुतळे अद्याप उभारण्यात आलेले नाहीत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार आहे, तो केवळ प्रतिष्ठापित करण्याची गरज आहे. पण, महर्षी वाल्मिकी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे तयार नसल्यामुळे शिवरायांचा पुतळा प्रतिष्ठापित झालेला नाही. गावातील चौकात तीन चबुतरे उभारण्यात आले आहेत. पण, त्यावर पुतळे कधी उभारण्यात येणार, याबाबत ग्रामस्थांना ठोस काहीच माहिती नाही.

मणगुत्तीचा वाद सीमाभागासह महाराष्ट्रात गाजला. अनेकांनी आंदोलने, उपोषणाचा इशारा दिला. पण, छत्रपती शिवरायांचा पुतळा अद्याप उभारण्यात आलेला नाही. राजकारणी लोक वेळा मारून नेत आहेत आणि वाल्मिकी आणि डॉ. बाबासाहेबांचा पुतळा लवकर तयार होत नाही, असे चित्र सध्या आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा मात्र प्रतिष्ठापणेच्या प्रतीक्षेत आहे.

पुतळ्याच्या प्रतिष्ठापनेबाबत गावात दबक्या आवाजात चर्चा करण्यात येते. पण, राजकारण्यांच्या दबावापुढे कोण बोलणार, असे चित्र पाहायला मिळते. दीड वर्षांपासून पुतळा प्लास्टिकमध्ये गुंडाळण्यात आला आहे, याबाबत शिवप्रेमींत मात्र तीव्र संताप आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यावर तोडगा निघावा, वाद मिटावा, अशी अपेक्षा लोकांना आहे.

तोडगा कधी निघणार?

इतर पुतळ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेली दीड वर्षे प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवण्यात आला आहे. पण, अजून किती दिवस प्रतीक्षा करायची, असा सवाल शिवप्रेमींतून उपस्थित होत आहे.

प्रतिष्ठापनेनंतर जुना चबुतरा हटवणार

गावच्या चौकात एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रतिष्ठापित करण्यात आलेला चबुतरा आहे. तेथून पुतळा काढून प्लास्टिकमध्ये गुंडाळून तो चावडीत ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे तीन चबुतरे उभारण्यात आले आहेत. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज, महर्षी वाल्मिकी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारण्यात येणार आहेत. पण, हे पुतळे उभारले जाईपर्यंत जुना चबुतरा काढला जाणार नाही, असा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज, महर्षी वाल्मिकी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारण्यावर एकमत आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा तयार आहे. तर इतर दोन पुतळे तयार होणार आहेत. त्या त्या समाजाने ते पुतळे तयार करण्याची सूचना आमदार सतीश जारकीहोळी यांनी केली आहे. हे पुतळे तयार झाले की सर्व पुतळे प्रतिष्ठापित करण्यात येतील.
– सुरेश बेण्णी ग्रामपंचायत अध्यक्ष मणगुत्ती

Back to top button