बेळगाव : बोडकेनट्टीत जमावाचा घरावर हल्‍ला | पुढारी

बेळगाव : बोडकेनट्टीत जमावाचा घरावर हल्‍ला

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा: हंदिगनूर ग्रा.पं मध्ये झालेल्या गैरकारभाराची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करणार्‍या युवकाच्या घरावर दगडफेक करण्यात आल्याची घटना बोडकेनट्टी येथे मंगळवारी घडली. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर शट्टू नायक या युवकाला काकती पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले आहे.

हंदिगनूर ग्रुप ग्रा.पं.च्या व्याप्‍तीत येणार्‍या बोडकेनट्टी येथील काही जणांनी जिल्हाधिकार्‍यांकडे ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केली होती. 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने घरे कोसळलेल्यांना घरे मंजूर करून देण्यात गैरकारभार झाला असून, योग्य लाभार्थ्यांना घरांचा लाभ करून देण्याऐवजी पैसे घेऊन भलत्यांनाच 50 घरे मंजूर करण्यात आली आहेत. यासाठी प्रत्येक
लाभार्थ्यांकडून 50 हजार रुपये घेण्यात आले आहेत.अशी तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सोेमवारी हे निवेदन देण्यात आले होते.

या रोषातून सदर निवेदन दिलेल्या बोडकेनट्टी येथील शट्टू नायक या युवकाच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे. गावातील 100 पेक्षा अधिक नागरीकांनी त्याच्या घरावर दगडफेक केली आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती समजताच काकती पोलिस निरीक्षक गुरुनाथ, उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प यांनी घटनास्थळी धाव घेऊन शट्टूला संरक्षण दिले. हल्ला करणार्‍यांचा शोध घेऊन लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे काकती पोलिसांनी सांगितले. प्रकरणाची जिल्हाधिकार्‍यांकडून सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button