

बेळगाव : सायबर फसवणुकीच्या घटना रोज घडत आहेत. यामुळे अनेकांना मोठा फटका बसत आहे. रायबाग तालुक्यातील एका व्यक्तीने मोबाईलवर आलेली लिंक ओपन केली. त्यानंतर काही तासांतच त्याच्या बँक खात्यातून 11 लाख 60 हजार रुपये लंपास करण्यात आले. 5 रोजी घडलेल्या या घटनेनंतर याप्रकरणी येथील जिल्हा सीईएन पोलिस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
आवण्णा दोडमणी (वय 37, रा. कप्पलगुद्दी, ता. रायबाग) असे फसवणूक झालेल्या फिर्यादीचे नाव आहे. आवण्णा यांचे सैदापूर येथील ॲक्सिस बँकमध्ये खाते आहे. या बँक खात्याला मोबाईल लिंक आहे. भामट्याने त्यांचा मोबाईल हॅक केला व व्हॉट्सअपला लिंक पाठविली. त्याने सदर लिंकवर क्लिक केले असता काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून 11 लाख 60 हजार 899 रुपये गायब झाले.
या घटनेनंतर तातडीने त्यांनी बँककडे धाव घेतली. मात्र बँकेतील अधिकाऱ्यानी आपण काहीच करू शकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर बेळगाव येथील सीईएन पोलिस स्थानकात फिर्याद दाखल झाली असून पोीलस निरीक्षक नंदेश्वर कुमार तपास करत आहेत.