

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला 100 ग्रॅम जास्त वजनामुळे अंतिम सामन्यातून अपात्र करण्यात आले. त्यानंतर विनेशने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये (सीएएस) केस दाखल केली आहे. या केसकडे संपुर्ण भारताचे लक्ष लागून आहे. अशा परिस्थितीत सीएएसने रोमोनियाच्या अॅथलिटला मोठा दिलासा दिला आहे. रोमानियन जिम्नॅस्ट ॲना बार्बोसू हिला आनंदाची बातमी दिली आहे. जिम्नॅस्टिक्सच्या फ्लोर इव्हेंटमध्ये पराभूत होऊनही अॅना बार्बोसू कांस्यपदक जिंकले आहे. तसेच, न्यायालयाने अमेरिकन जिम्नॅस्ट जॉर्डन चिलीसचे कांस्यपदक हिसकावले आहे. या स्पर्धेत अनुक्रमे जॉर्डन तिसऱ्या आणि अॅना चौथ्या क्रमांकावर होत्या. आता या निकालामुळे विनेशलाही पदक मिळण्याची आशा तयार झाली आहे.
जिम्नॅस्टिक्सच्या फ्लोर इव्हेंट स्पर्धेच्या अंतिम फेरीत, जॉर्डनने 13.766 गुणांसह तिसरे स्थान मिळवून कांस्यपदक जिंकले होते. तर अॅनाचा स्कोअर 13.700 होता. त्यामुळे ती चौथ्या स्थानावर राहिल्यानंतर बाहेर पडली. म्हणजे एक प्रकारे तिचा पराभव झाला. सीएएसच्या निर्णयानंतर आता हे प्रकरण पूर्णपणे मोडीत निघाले आहे. या सामन्यातील पराभवानंतर ॲना बार्बोसू आणि तिच्या टीमने सीएएसमध्ये केस दाखल केली होती. तेव्हा ती म्हणाली की जॉर्डन चिलीसला चुकीचे गुण देण्यात आले, त्यामुळे ती तिसरी राहिली आणि कांस्यपदक जिंकले. या प्रकरणी सीएएसमध्ये दीर्घ सुनावणी झाली आणि कोर्टाने निकाल फिरवून अॅनाला विजयी घोषित करण्यात आले.
यानंतर सीएएसने जॉर्डन चिलीचा गुणही वजा केला आहे. या निर्णयानंतर जॉर्डन चिलीचा स्कोअर 13.666 झाला आहे. यासह ती पाचव्या स्थानावर पोहोचली. तर अॅना बार्बोसू तिसऱ्या स्थानावर आहे. अशाप्रकारे न्यायालयाच्या निर्णयानंतर अॅना कांस्यपदक देण्यात आले. आता या निर्णयानंतर अॅना खूश झाली आहे. जिम्नॅस्टिक्स फ्लोअर इव्हेंटच्या अंतिम फेरीत ब्राझीलच्या रेबेका अँड्रेडने सुवर्णपदक तर अमेरिकेच्या सिमोन बायल्सने रौप्यपदक पटकावले.
विनेश फोगटचा खटलाही सीएएस कोर्टात सुरू आहे. 50 किलो फ्रि-स्टाइल कुस्तीच्या अंतिम फेरीत प्रवेश करून विनेशला रौप्य पदकाची खात्री होती, परंतु तिला पदक सामन्यापूर्वीच अपात्र ठरवण्यात आले कारण तिचे वजन ऑलिम्पिक सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी 100 ग्रॅम जास्त होते.
विनेशने उपांत्य फेरीत क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमनचा 5-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. याबरोबरच विनेशला फायनल जिंकून सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती. पण अंतिम सामन्याच्या दिवशी सकाळी विनेशचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले आणि तिला अपात्र ठरवण्यात आले. यानंतर विनेशने सीएएसमध्ये केस दाखल केली असून, त्यावर १३ ऑगस्ट रोजी निर्णय होणार आहे. विनेशच्या बाजूने निर्णय आल्यास त्यांना संयुक्तपणे रौप्यपदक मिळेल.
ऑलिम्पिक खेळांदरम्यान किंवा उद्घाटन समारंभाच्या 10 दिवसांच्या कालावधीत उद्भवलेल्या कोणत्याही विवादाच्या मध्यस्थीद्वारे निराकरण करण्याचे काम कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (सीएएस) ही आंतरराष्ट्रीय संस्था पाहते. १९८४ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील लॉसने येथे आहे. CAS चे काम क्रीडा विवाद, विशेषत: शिस्तभंग प्रकरणे आणि डोपिंग प्रकरणांमध्ये निष्पक्ष आणि तटस्थ निर्णय देणे असे आहे. त्याचे निर्णय अनिवार्य आहेत आणि ती क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च न्यायालयीन संस्था मानली जाते.