BCCI च्या बैठकीत रोहित-विराट-द्रविड यांची होणार चौकशी, जय शहा विचारणार पराभवाचा जाब

BCCI च्या बैठकीत रोहित-विराट-द्रविड यांची होणार चौकशी, जय शहा विचारणार पराभवाचा जाब
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून 10 गडी राखून पराभव झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) संतापले आहे. स्पोर्ट्स पोर्टल 'इनसाइड स्पोर्ट'च्या वृत्तानुसार, बीसीसीआय लवकरच आढावा बैठक घेणार आहे. या बैठकीत प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid), कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांना प्रश्न विचारले जाणार आहेत.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी जय शहा असतील…

बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) या बैठकीत टीम इंडियाच्या खराब कामगिरीचा आढावा घेणार आहेत. बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न सांगण्याच्या अटीवरून माहिती दिली की, टी 20 वर्ल्ड कपच्या (t20 World Cup) उपांत्य फेरीतील पराभवातून आम्ही सावरलेलो नाही. याबाबत बीसीसीआय लवकरच एक बैठक घेणार आहे. साहजिकच संघात बदलाची गरज आहे. पुनरावलोकनात संघाचे ऐकणे देखील महत्त्वाचे आहे. याशिवाय कोणताही निकाल मिळू शकत नाही. त्यामुळे रोहित, द्रविड आणि कोहली यांचे विचार ऐकून भविष्यातील टी-20 संघांची आखणी केली जाईल.'

भारताची ओपनिंग जोडी फ्लॉप…

भारताचा (Team India) सलामीवीर केएल राहुलने टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत निराशा केली. महत्त्वाच्या सामन्यांमध्ये त्याची बॅट थंडावली. अनेकांनी तर त्याला संघात स्थान देऊन ओपनिंगला कशाला पाठले असा सवाल उपस्थित केला आणि त्याला संघातून काडोन टाका असा सल्लाही दिला. राहुलने पाकिस्तान विरुद्ध 4, द. आफ्रिके विरुद्ध 9, इंग्लंड विरुद्ध 5 धावा केल्या. तर दुसरा सलामीवीर कर्णधार रोहित शर्माही संघासाठी काहीच योगदान देऊ शकला नाही. त्याने पाकिस्तान विरुद्ध 4, झिम्बांब्बे विरुद्ध 12, द. आफ्रिके विरुद्ध 15, इंग्लंड विरुद्ध 27 धावा केल्या. केवळ नेदरलँड संघाविरुद्ध त्याने 53 धावा फटकावल्या. राहुल-रोहित ही सलामीची जोडी सर्व स्पर्धेत फ्लॉप ठरली. पॉवर प्लेच्या 6 षटकांमध्ये त्यांना कसलाच करिष्मा दाखवता आला नाही. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने पॉवर प्लेच्या षटकांमध्ये 2 विकेट गमावून 32 धावा केल्या. पुढच्या सामन्यांमध्येही टीम इंडियाचे असेच खराब प्रदर्शन सुरूच राहिले. दुस-या सामन्यात नेदरलँड विरुद्ध 1 विकेट गमावून 32, तिस-या सामन्यांत 2 विकेट गमावून 33, चौथ्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध 1 विकेट गमावून 37, पाचव्या सामन्यात झिम्बाब्बे विरुद्ध 1 विकेट गमावून 46, तर सेमी फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध 1 विकेट गमावून 38 धावाच करू शकली.

निवड समितीही निशाण्यावर…

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय निवड समितीच्या कामगिरीवर नाराज आहे. माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा हे निवड समितीचे प्रमुख आहेत. दरम्यान, बीसीसीआयच्या बैठकीत निवड समितीच्या कामगिरीचाही आढावा घेतला जाणार आहे. चेतन शर्माला निवड समितीच्या प्रमुखपदावरून हटवले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, चेतन स्वत: या बैठकीत सहभागी होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पुढील टी 20 विश्वचषक स्पर्धा 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवली जाईल. बीसीसीआयचा असा विश्वास आहे की तोपर्यंत बहुतेक वरिष्ठ खेळाडू टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतील. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'पुढील एका वर्षात टी-20 संघात बरेच बदल होतील. रोहित शर्मा, विराट कोहली, दिनेश कार्तिक आणि आर अश्विनसारखे खेळाडू हळूहळू बाहेर पडतील. आम्ही कोणत्याही वैयक्तिक खेळाडूचा विचार करत नसून संपूर्ण संघाचा विचार करत आहोत. खेळाडू स्वतः निर्णय घेऊ शकतात. आम्ही क्रिकेट आणि टीम इंडियाचा विचार करत आहोत. उपांत्य फेरीतील इंग्लंड विरुद्धच्या पराभवानंतर महत्त्वाचे निर्णय घेतले जातील.'

उपांत्य फेरीत इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर भारत 2022 च्या टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला. 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने एकही विकेट न गमावता 170 धावा केल्या. टीम इंडियाने पुन्हा एकदा मोठ्या टूर्नामेंटमध्ये निराशाजनक कामगिरी केली. संघाला ट्रॉफी न जिंकता मायदेशी परतावे लागले. याचे अनेकांना दु:ख झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news