

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : चीन आणि बेलारूसच्या सहाय्याने अतिशय गुप्तपणे विनाशकारी बॅलेस्टिक मिसाईल तयार करू पाहणार्या पाकिस्तानला अमेरिकेने अद्दल घडविली. पाकच्या विध्वंसकारी अण्वस्त्रनिर्मितीला सहायक ठरणार्या चिनी आणि बेलारूसच्या कंपन्यांवर अमेरिकेने बंदी घातली आहे.
अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चीनमधील 3 तर बेलारूसच्या एका कंपनीकडून पाकला विध्वंसक क्षेपणास्त्र निर्मिती करण्यासाठी सामग्री आणि उपकरणांचा पुरवठा करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या कंपन्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चीनस्थित शीआन लोंगडे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट लिमिटेड, ग्रॅनपेक्ट लिमिटेड, तियानजिन क्रिएटिव्ह सोर्स आणि बेलारूसस्थित मिन्स्क व्हील प्लांट या कंपन्यांनी पाकिस्तानला लांब पल्ल्याच्या लक्ष्याचा भेद करण्यासाठीच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी फिलामेंट वायडिंग, स्टिर वेल्डिंगसह अन्य उपकरणांचा पुरवठा केल्याचे उघड झाले आहे.
या कंपन्यांकडून सामूहिक विनाशकारी क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यासाठी पाकला मशिन्स आणि उपकरणांचा पुरवठा करण्यात येत असल्याचे अमेरिकेच्या तपासातून पुढे आले आहे. पाकिस्तानच्या अण्वस्त्र निर्मितीसाठी उपकारक ठरणार्या सामग्रीचा पुरवठा या कंपन्यांकडून करण्यात येत असल्यामुळे या कंपन्यांवर अमेरिकेत बंदी घालण्यात आली आहे. पाकमधील रॉकेट मोटर्स आणि अण्वस्त्रवाहू अवकाश यानासाठीही या कंपन्यांकडून गुप्तपणे पाकला मदत केली जात होती. मिन्स्क या बेलारूसच्या कंपनीकडून पाकला संहारक क्षेपणास्त्र निर्मितीसाठी उपकरणांचा पुरवठा करण्यात येत होता, असेही अमेरिकेने म्हटले आहे.