

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती स्थिर असून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन धानोरकर कुटुंबियांनी केले आहे. प्रकृती अस्वस्थामुळे रविवारी नागपूर येथून एअर अँब्यूलन्सने त्यांना राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील गुरूग्राम येथील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्यावर रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक उपचार करीत असून सध्या धानोरकर डायलिसिसवर असल्याचे कळतेय.
दोन दिवसांपूर्वी किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर गुंतागुंत झाल्यावर त्यांना एअर ॲम्बुलन्सद्वारे दिल्लीत हलविण्यात आले. त्यांच्या आतड्यांवर सूज असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांची पत्नी आणि वरोरा विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह दोन्ही मुले देखील दिल्लीत असून, धानोरकरांचे निकटवर्तीय देखील रुग्णालयात असल्याचे कळते.