

दक्षिण-पश्चिम पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात अलीकडेच झालेल्या एका मोठ्या आत्मघातकी स्फोटात 52 लोक ठार झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बलुचिस्तान सातत्याने धुमसत आहे. सामाजिक, आर्थिक मागासलेपण तसेच सांस्कृतिक दबलेपणामुळे पिचलेला बलुचिस्तान आज करुणकथा आणि व्यथा जगासमोर मांडत आहे. कारण, त्या समजून घेण्याऐवजी दाबून टाकण्यातच पाकिस्तानातील सत्ताधार्यांना रस आहे. त्यामुळे बलुची तरुण अस्वस्थ आहेत.
अन्य देशांत लुडबूड करून काश्मीर, बंगाल हे प्रदेश विभक्त करण्याच्या नादात असलेल्या पाकिस्तानलाही स्वतंत्रपणे बलुचिस्तान, पख्तुनीस्तान यासारख्या पृथकतावादी चळवळीला सामोरे जावे लागत आहे. करावे तसे भरावे या न्यायाने पाकिस्तानही प्रतिकूल संक्रमण अवस्थेतून जात आहे; परंतु आपले ठेवावे झाकून आणि दुसर्याचे पाहावे वाकून या न्यायाने पाकिस्तानचे नेहमीचेच वर्तन राहिले आहे. अलीकडे बलुची तरुण नेता कमल बलुची याची हिंसक हत्या झाल्यानंतर पुन्हा स्वतंत्र बलुचिस्तानचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसे पाहिले तर बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील सर्वांत मोठा प्रांत आहे. एका बाजूला अफगाणिस्तानची सीमा आणि दुसर्या बाजूला इराणची सीमा अशा विस्तीर्ण प्रदेशात पसरलेल्या या भूभागाला आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की, या भूभागाला जोडून असलेल्या इराणच्या आणि अफगाणिस्तानच्या काही प्रदेशावरही बलुचिस्तानचा दावा आहे. हा प्रदेश भूराजनैतिक द़ृष्टीने महत्त्वाचा आहे. परंतु, सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे प्रभुत्व पाहता मागील 75 वर्षांत सर्वाधिक मागासलेला राहिलेला कोणता प्रांत असेल, तर तो बलुचिस्तान होय. त्यामुळे बलुचि तरुण अस्वस्थ आहेत आणि ते स्वतंत्र राष्ट्राच्या उभारणीसाठी प्रयत्नशील आहेत.
1987 मध्ये बलुचिस्तानच्या स्वतंत्र चळवळीत सुप्त प्रारंभ झाला. 1987 मध्ये सुशिक्षित बलुची तरुणांनी बलुची राष्ट्रीय युवा चळवळीची स्थापना केली. त्यातून त्यांच्या राष्ट्रवादाच्या ठिणग्या उदयास आल्या. या चळवळीचा उद्देश होता बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याबद्दल जनजागृती करावयाची व स्वतंत्र राष्ट्र उभे करावयाचे. त्यांचा नेता फिदा अहमद हा 1988 मध्ये पाकिस्तानी लष्कराच्या आदेशानुसार मारला गेला. त्याने पहिल्यांदा हौतात्म्य पत्करले. तो स्वतंत्र बलुचिस्तान या कल्पनेचा नायक मानला जातो. त्याच्या हत्येनंतर या गटातील सर्वांत ज्येष्ठ नेते डॉ. मलिक हे होते. बलुचिस्तानमध्ये विद्यमान मुख्यमंत्री आणि डॉक्टर हैदर बलुची यांनी पाकिस्तानच्या संसदीय राजकारणात भाग घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या पक्षाचे नाव बदलून बलुचिस्तान नॅशनल मुव्हमेंट असे ठेवले. हा पक्ष अल्पावधितच बलुचिस्तानमध्ये सर्वांत मजबूत पक्ष बनला. बलुचिस्तान विधानसभेत तसेच पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये या पक्षाने बर्याच जागा मिळवल्या. पक्षाच्या धुरंधर नेत्यांनी अनेक डावपेच टाकले. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यापासून पाकिस्तानधमील प्रांतीय स्वायत्तेची मागणीही त्यांनी केली. अशा प्रकारे बुद्धिबळाच्या पटातील सोंगट्या फिरवाव्यात तसे राजकारण करत राहिले.
बलुचिस्तानच्या विकासाची चळवळ, स्वतंत्र राष्ट्राची चळवळ प्रादेशिक विकासाच्या अनेक पैलूंनी सतत बदलत राहिली. सरकारमधील त्यांच्या सहभागाचे स्वरूपही बदलत राहिले. पहिल्या कार्यकाळानंतर प्रसार माध्यमांमध्ये आणि येथील राजकारणातील अंतर्गत वर्तुळात बहुचर्चित भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेच्या बातम्या येऊ लागल्या. त्याबरोबरच काही वेळा ही चळवळ बदनाम झाली. तथापि, त्यांनी चळवळीची व्याप्ती अनेक अंगांनी वाढवली. या पक्षाची विद्यार्थी शाखा गुलाम मोहम्मद बलुच यांच्या नेतृत्वाखाली विकसित होत गेली. बलुच स्टुडंड ऑर्गनायजेशन असे नाव तिने धारण केले, तरीसुद्धा पाकिस्तानमधून स्वातंत्र्याची मागणी हे लोक करतच होते. थोडक्यात काय, तर सत्तेत सहभाग आणि संघर्ष असे दुहेरी तंत्र बलुचींनी कायम ठेवले. त्याबरोबर त्यांचे राजकीय पवित्रेही बदलत गेले.
1992 नंतर गुलाम मोहम्मद बलुच यांनी बीएसओ या संघटनेमध्ये सर्वस्व समर्पित केले. त्यातूनच बलुचिस्तान राष्ट्रीय चळवळीत ते सामील झाले. पाकिस्तानच्या भ्रष्ट कारभारातील राजकारणाचा सहभाग त्यांनी संपवून टाकण्याचा निर्णय घेतला आणि एक स्वतंत्र भूमिका घेतली. स्वतंत्र बलुचिस्तानच्या चळवळीसाठी बलुच लोकांना एकत्रित करणे हे त्यांच्या पक्षाचे मूळ ध्येय होते. या ध्येयाकडे त्यांनी संघटनेला परत वळविले. पक्षात त्यांचा प्रभाव कलेकलेने वाढत गेला आणि ते पक्षाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष बनले.
बलुची चळवळीतील राजकीय नेत्यांचा उदय आणि विकास, त्यांच्यातील अंतर्गत संघर्ष या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर असे दिसते की, राजकीय पटलावरील नेत्यांचे क्रम झपाट्याने बदलत गेले आहेत. 2004 मध्ये त्यांच्या गटाने पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये स्वातंत्र्याची मागणी समाविष्ट करण्याचा धाडसी आणि यशस्वी प्रयत्न केला आणि पक्षाचे नावही त्यांनी नव्याने धारण केले. हे नाव त्यांनी बलुच राष्ट्रीय चळवळ असे ठेवले. डॉ. मलिक बलोच आणि त्यांच्या समविचारी नेत्यांनी दुसर्या पक्षात प्रवेश केला आणि फाटाफुटीस प्रारंभ झाला. पक्षाच्या नावातून बलुचिस्तान हा शब्द काढून टाकून त्यांच्या गटाचे नाव नॅशनल पार्टी असे ठेवले. 2009 पर्यंत बलुच राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व मलिक यांनी केले, तेव्हा त्यांची पाकिस्तानी सैन्याने हत्या केली.
पक्षाच्या अध्यक्षपदाच्या त्यांच्या 6 वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी बीएनएम पक्षाला बलुचिस्तानमधील सर्वांत मोठा पक्ष असे स्थान मिळवून दिले. लोक पुन्हा बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा नारा देऊ लागले. हा त्यांच्या कार्यकाळाचा सर्वांत मोठा यशाचा भाग होता. गुलाम मोहम्मद यांनी बलुची फुटीरतावादी अतिरेक्यांमध्ये इतका आदर होता की, ते त्यांना यूएनएचसीआरचे अधिकारी जॉन शोलकी यांची सुटका करण्यास राजी करू शकले. संयुक्त राष्ट्रे आणि पाकिस्तानमधील अमेरिकन दूतावासाने त्यांच्या हत्येचा निषेध केला. मानवतावादी कारणासाठी केलेल्या प्रस्तावावर त्यांचे विशेष कौतुक केले होते. अशा प्रकारे स्वंतत्र बलुची चळवळीत त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. काळ बदलत गेला आणि स्थितीही पालटत गेली. सध्या पक्षाचे नेतृत्व नसीम बलोच करीत आहेत. त्यांनी शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत आपला आवाज पोहोचवला आहे. पाकिस्तानी सैन्याने त्यांचेही अपहरण केले व त्यांनाही मारण्यात आले.