

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : बालिंगा (ता. करवीर) येथील कात्यायनी ज्वेलर्सवरील दरोडा व त्यानंतर परिसरात दहशत माजविण्यासाठी दरोडेखोरांनी तीन पिस्तुलचा वापर केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. दरोड्याचा कट रचणार्या अंबिका ज्वेलर्सचा मालक आणि सूत्रधार सतीश पोहाळकर व त्याचा साथीदार विशाल वरेकरला सोमवारी सकाळी कणेकरनगर व कोपार्डे (ता. करवीर) येथे तपासासाठी स्वतंत्रपणे फिरविण्यात आले. दरोड्यानंतर पसार झालेल्या स्थानिक संशयिताच्या शोधासाठी पोलिसांनी काही ठिकाणी पहाटे छापे टाकले. मात्र सुगावा लागला नाही.
बालिंगा येथील कात्यायणी ज्वेलर्सवर गुरूवारी ( दि.8) भरदिवसा दरोडा टाकून दरोडेखोरानी दोन कोटीहून अधिक किंंमतीचे दागिने लुटले होते. यावेळी झालेल्या झटापटीत दरोडेखोरानी केलेल्या गोळीबारात ज्वेलर्सचा मालक रमेश माळी व जितेंद्र माळी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दरोडेखोरांचा पर्दाफाश करून सराफी व्यावसायिक सतिश पोहाळकर व विशाल वरेकरला अटक केली आहे. सद्या दोघेही पोलिस कोठडीत आहेत.
याप्रकरणाच्या चौकशीत तपासाधिकार्यांनी पोहाळकर व वरेकरवर प्रश्नांची सरबत्ती केली. सुूरूवातीला पोलिस चौकशीत सहकार्य न करणार्या संशयितांना मखाकीफ चा प्रसाद मिळताच पोपटासारखे तोंड उघडले. पोहाळकर व वरेकर दोघेही एकमेकांचे परिचित असले तरी वरेकरमुळेच मध्यप्रदेशातील भिंड जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगार पवनकुमार शर्मा व शार्पशुटर छोटूची पोहाळकर याच्याशी ओळख झाली. पोहाळकरने कात्यायणी ज्वेलर्सवरील दरोड्याचा कट रचला आणि वरेकरने परप्रांतिय दरोडेखोरांच्या सहाय्याने मोहिम फत्ते केल्याचे निष्पन्न झाले आहे.
11 पेक्षा अधिक गोळ्या झाडल्याचा पोलिसांचा संशय
ज्वेलर्सवरील दरोडा व दहशत माजविण्यासाठी तीन दरोडेखोरांकडे असलेल्या तीनही पिस्तुलांचा यावेळी वापर झाला आहे. पिस्तूलातून 11 गोळ्या झाडल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे येत असली तरी त्यापेक्षाही अधिक प्रमाणात दरोडेखोरांनी गोळ्या झाडल्याचा तपासाधिकार्यांचा संशय आहे. पवनकुमार शर्मा व छोटू पोलिसांच्या हाती लागल्यानंतर सर्व बाबी स्पष्ट होतील, असेही सांगण्यात आले.
पोहाळकरने चोरलेली वाहने
कणेरकरनगरातील घरात लपविली !
तपासाधिकार्यांनी सोमवारी पोहाळकर व वरेकरला काही ठिकाणी फिरविले. दरोड्याच्या घटनेपुर्वी पोहाळकरने जुना राजवाडा व शाहूपुरी परिसरातून दोन दुचाकी चोरून कणेकरनगर येथील आपल्या घरी लपवून ठेवल्या होत्या. पोलिसांनी त्याच्या घराची पाहणी केली. यावेळी स्वत: पोहाळकरने घरासह दुचाकी लपवून ठेवलेली जागा पोलिसांना दाखविली.
कोपार्डेतील वरेकरच्या घराची पोलिसांनी केली पाहणी
दरोड्याच्या घटनेनंतर पोहाळकरसह सातही दरोडेखोर विशाल वरेकर याच्या कोपार्डे येथील घरी सायंकाळी एकत्रित आले होते. तेथेच लुटलेले सोने व रोख रकमेची वाटणी करण्यात आली होती. वरेकरने स्वत:चे घर व दागिन्यांची वाटणी केलेले ठिकाण तपासाधिकार्यांना दाखविले. पोलिसांची घटनास्थळाचा पंचनामा केला. वरेकरचे 30 वर्षापासून कोपार्डे परिसरात वास्तव्य आहे. याकाळात उदगाव ( ता. शिरोळ) येथील नात्यातील कोणाही व्यक्तीशी त्याचा संपर्क राहिला नसल्याचेही सांगण्यात आले.
जखमी सराफांच्या प्रकृतीचा धोका टळला !
गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या दोन्हीही सराफांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे. रमेश माळी यांना रुग्णालयातून काल रविवारी सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आला आहे. जितेंद्र माळी यांच्या मांडीतून गोळी आरपार गेल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र ते अजूनही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे त्याचा सोमवारी जबाब होवू शकला नाही.
ओंजळीने दागिन्यांची वाटणी
लुटलेल्या दागिन्यांची वरेकरच्या घरात वाटणी करण्यात आली. ही वाटणी दागिने ओंजळीत घेऊन हाताला जाणवलेल्या वजनाच्या आधारे करण्यात आली. लुटीतील दागिन्यांचा खोलीत एकत्रित ढीग करण्यात आला आणि त्यातून ओंजळीने सात वाटे करून दागिन्यांची दरोडेखोरांनी वाटणी केली. वाट्याला आलेले दागिने घेऊन सर्वजण पसार झाले.