साडेतीन मुहूर्तांतील बलिप्रतिपदा

साडेतीन मुहूर्तांतील बलिप्रतिपदा
Published on
Updated on

बली हा आसुर असला, तरी सत्वसंपन्‍न व सद‍्गुणी होता. लोककल्याणासाठी कामे करणारा होता. सत्यवक्‍ता, बलाढ्य आणि सावध असा राजा होता. केरळात साजरा होणारा ओणम हा उत्सव बलीराजाच्या आहराप्रीत्यर्थ असणारा उत्सव आहे. 'इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो,' असे ग्रामीण महाराष्ट्रात म्हटले जाते. त्यावरून बलिराजा हा प्रजेचा योगक्षेम नीट चालविणारा राजा होता, हे लक्षात येते. सात चिरंजीवांमध्येही बलीची गणना प्रेमाने केली गेली आहे. दीपावली उत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातील, समाजातील सार्‍या जणांना एकत्र येण्याची आणि एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्याची सुंदर संधी मिळते. महत्त्वाचं म्हणजे दिवाळीत पितरांचे स्मरण असते. त्यांनी घालून दिलेल्या चांगल्या प्रथांना जिवंत राखण्याच्या जबाबदारीचे पुनःस्मरण नव्या पिढीला करून देणे गरजेचे असते. दिवाळीच्या निमित्ताने सगुण-निर्गुण आणि द‍ृश्य-अद‍ृश्य शक्‍तींची पूजा होते. आता दिवस येतो तो बलिप्रतिपदेचा. या रात्री बळीप्रीत्यर्थ दीपदान आणि वस्त्रदान करावयाचे असते. जमिनीवर पाच रंगांच्या रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून नैवेद्य दाखविला जातो. विक्रम संवताचा हा पहिला दिवस मानला जातो, त्याचप्रमाणे साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त असतो. धर्मशास्त्राच्या ग्रंथांत या दिवशी काय काय करावे, हे सांगताना म्हटले आहे, 'सकाळी अभ्यंगस्नानाने सुरुवात करावी. नवे कपडे घालावेत. घरच्या गायी-बैलांची पूजा करावी. त्यांची सुशोभित मिरवणूक काढावी. या दिवशी गायीचे दूध त्यांच्या वासरांकरिताच ठेवावे. बलिप्रतिपदा च्या निमित्ताने रस्ते बांधणे, तलाव खोदणे, नदीला घाट बांधणे यासारखी समाजोपयोगी कामे करावीत. रात्री बळीची पूजा करावी. ललित कार्यक्रम करावेत. स्त्रियांनी आपल्या पतीस ओवाळावे.' या दिवशी काही जण रथयात्रा नावाचे व्रत करतात. या रथयात्रेत अग्‍नी आणि ब्रह्मा यांची पूजा सांगितली आहे. गोवर्धनाची पूजा करावी, असे म्हटले आहे.

गोवर्धन पूजेसाठी प्रतीकरूप म्हणून शेणाचा बक पर्वत केला जातो. त्यावर दुर्वा व फुले खोचतात. कृष्ण, अन्य गोपाळ, इंद्र, गायी, वासरे यांची चित्रे त्याच्या शेजारी मांडतात. त्यांचीही पूजा करतात. पर्वताची पूजा करणे महत्त्वाचे आहे, असा उल्‍लेख ग्रंथात मिळतो. बलिप्रतिपदा या शब्दातच ज्यांचा गौरव कळतो, तो म्हणजे बलिराजा होय. तो कोण होता? बली हा एक दैत्यराज होता. तो प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा मुलगा होता. बली बलाढ्य होता. त्याने कठोर तप करून सामर्थ्य मिळविले व स्वर्गावर विजय मिळवला. प्रल्हादासारख्या आपल्या नीतिमान आजोबांना बोलावून त्याने स्वर्गाचे राज्य देऊ केले; पण प्रल्हादांनी ते न घेता 'धर्माने राज्य चालव', असा आशीर्वाद देऊन बलीकडेच जबाबदारी सोपवली. विविध घटना, प्रसंग निभावत बली अजिंक्य राहिला. दैत्यांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध बली ठामपणे उभा राहिला. यथावकाश विष्णूने वामन अवतार घेऊन बलीच्या शक्‍तीला निर्बंध घातला. प्रल्हाद विष्णुभक्‍त असल्याने विष्णूने बलीला सप्‍त पातालांपैकी सुतल येथे राहायला सांगितले. प्रसन्‍न झालेल्या विष्णूने बलीला शब्द दिला की, 'सुतलाच्या ठिकाणी मी तुझा द्वारपाल म्हणून थांबेन. माझे चक्र तुझे संरक्षण करेल.

आजची तिथी ही तुझ्या नावाने म्हणजे बलिप्रतिपदा म्हणून लोक ओळखतील. आजच्या दिवशी तुझी पूजा होईल.' बली हा आसुर असला, तरी सत्वसंपन्‍न व सद‍्गुणी होता. लोककल्याणासाठी कामे करणारा होता. सत्यवक्‍ता, बलाढ्य आणि सावध असा राजा होता. केरळात साजरा होणारा ओणम हा उत्सव बलीराजाच्या आहराप्रीत्यर्थ असणारा उत्सव आहे. 'इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो,' असे ग्रामीण महाराष्ट्रात म्हटले जाते. त्यावरून बलिराजा हा प्रजेचा योगक्षेम नीट चालविणारा राजा होता, हे लक्षात येते. सात चिरंजीवांमध्येही बलीची गणना प्रेमाने केली गेली आहे.

मुख्यत्वे उत्तर प्रदेशी संस्कृतीत गोवर्धन पूजा या दिवशी केली जाते. कोवळे गवत, पाने इत्यादींचे दान करून जो गायींना पुष्ट करतो, तो गोवर्धन पर्वत होय. त्याला श्रीकृष्णाचे अंशरूप असेही कौशिकोपनिषदात म्हटले आहे. कार्तिक महिन्यात गोवर्धन पर्वताची परिक्रमा करण्याची प्रथा होती. बारा मैल अंतराच्या या प्रदक्षिणेला 'दंडवती परिक्रमा' म्हटले जाते. इंद्राचा राग आणि श्रीकृष्णांनी आपल्या करंगळीवर उचललेल्या गोवर्धन पर्वताची कथा सर्वसाधारणपणे सर्वांना ठाऊक असते. गोवर्धन पर्वतावर श्रीनाथजींचे म्हणजे श्रीकृष्णाचे मंदिर आहे. श्रीकृष्णाने पर्वतपूजेचा उत्सव सुरू केला. भारतीय परंपरेत पर्वतांना विविध कारणांमुळे पूजनीय मानण्याची रीत आहे. अनेक जनजातीय लोकांचे देव पर्वत असतात किंवा पर्वतावर मंदिरे असतात. निसर्गातील महत्त्वाचा घटक म्हणून पर्वतराजीला निःसंशय मोठे स्थान आहे. त्याचे संरक्षण, जतन व्हावे, यासाठी धार्मिक धागा त्याच्याशी जोडला की, समाज एकत्र येऊन काम करतो. हीच बाब गोवर्धन पूजेच्या निमित्ताने समोर येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news