

पुणे, पुढारी वृत्तसेवा: अनाथ, बेघर बालकांचे कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे, तसेच या प्रकारच्या मुलांना पर्यायी कुटुंब उपलब्ध व्हावे, यासाठी बालसंगोपन योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. नवीन नियमानुसार प्रतिमहिना पालकांस 2 हजार 250, तर संस्थेस 2 हजार 500 रुपये एवढी अनुदानात वाढ केलेली आहे.
महिला आणि बाल विकास विभागाच्यावतीने अनाथ, बेघर तसेच अन्य आपत्तीत असलेल्या बालकांसाठी बाल संगोपन योजना राबविण्यात येते. संगोपन व्यवस्थित व्हावे, यासाठी संबंधित बालकांना कुटुंब अथवा एखाद्या सामाजिक संस्थेकडे सुपूर्त केले जाते. यासाठी महिला आणि बाल विकास विभागाच्या वतीने अनुदान देण्यात येते.
महिला आणि बालविकास विभागाच्यावतीने पूर्वी ज्या कुटुंबाच्यावतीने बालकाचे संगोपन करण्यात येते. त्यांना प्रतिमहिना 1 हजार 150 अनुदान देण्यात येत होते. त्यांना आता प्रतिमहिना 2 हजार 250 रुपये वाढ केली आहे. सामाजिक संस्थांच्यावतीने संगोपन करण्यात येत असलेल्या बालकास 2 हजार 500 प्रतिमहिना एवढी वाढ केली असल्याचे महिला आणि बाल विकास विभागाकडून सांगण्यात आले आहे.