

जगामध्ये सात प्राचीन आणि सात अर्वाचीन आश्चर्ये आहेत. पण जगात एक आठवं आश्चर्यसुद्धा होतं. ते एका मोठ्या उत्पातामध्ये नष्ट झालं. न्यूझीलंडमध्ये रोटामाहना या मोठ्या सरोवराच्या आधी उत्तरेकडील भागात गुलाबीशुभ्र छते अस्तित्वात होती. त्यालाच पिंक व्हाईट टेरेसेस असं म्हटलं जात होतं. पण 1886 मध्ये झालेल्या ज्वालामुखीच्या स्फोटात हे आठवं आश्चर्य नष्ट झालं.
कोलोसस ऑफ रोड्स, ग्रेट पिरॅमिड ऑफ गीझ, बॅबिलोनचे हँगिंग गार्डन, ऑलिम्पियातील झ्यूसचा पुतळा, इफिसस येथील आर्टेमिसचे मंदिर, हॅलिकर्नासस येथील समाधी आणि अलेक्झांड्रियाचे दीपगृह अशी जगातील सात प्राचीन आश्चर्ये; तसेच ताजमहाल (आग्रा, भारत), द ग्रेट वॉल (चीन), क्राइस्ट द रिडीमर स्टॅच्यू (रिओ डी जानेरो), माचू पिचू (पेरू), चिचेन इत्झा (युकाटन प्रायद्वीप, मेक्सिको), रोमन कोलोसियम (रोम), पेट्रा (जॉर्डन) ही जगातील सात अर्वाचीन आश्चर्ये आहेत. पण तुम्हाला एक आठवं आश्चर्य माहीत आहे का? हे आठवं आश्चर्य आज अस्तित्वात नाही. मग हे आठवं आश्चर्य कुठे नष्ट झालं? कसं नष्ट झालं? केव्हा नष्ट झालं? त्याचीच तर ही रहस्यरंजक गोष्ट…
न्यूझीलंडमधील रोटोमहाना हे 2200 एकरात विस्तारलेलं विस्तीर्ण असं एक सरोवर आहे. या सरोवराच्या निर्मितीच्या आधी उत्तरेकडील दिशेला प्राचीन काळापासून गुलाबी आणि पांढर्या रंगांचे स्तर होते. त्याला छत (पिंक-व्हाईट टेरेसेस) असं म्हटलं जायचं. इथल्या माओरी जमातीच्या पूर्वजांच्या पवित्र जमिनीवर हे चकाकणारे स्तर पुरातन काळात निर्माण झाले होते. हे स्तर पाहण्यासाठी जगभरातून पर्यटकांची रीघ लागून राहत असे. ही गुलाबी-शुभ्र छते 10 जून 1886 पर्यंत अस्तित्वात होती. त्यानंतर ती नष्ट झाली. जोवर हे स्तर होते, तोवर त्यांची गणना जागतिक आश्यर्चांमध्ये केली जात होती.
हे गुलाबी-शुभ्र स्तर म्हणजे जगातले सर्वात मोठे सिलिकाचे साठे होते की, क्लोराईड पाणीमिश्रित असलेल्या दोन भू-औष्णिक झर्यांमुळे सिलिका-सॅच्युरेटेड स्तर तयार झाले होते? हे जगप्रसिद्ध झरे हॉट स्प्रिंग्स आणि गीझर्सच्या समूहाचा भाग होते. मुख्यतः पिनॅकल रिज नावाच्या पूर्वेकडील रिजच्या बाजूने हे झरे वाहत होते.
रोटोमहाना परिसराला भेट देणार्या पहिल्या युरोपियनांपैकी एक अर्न्स्ट डायफेनबॅक हा एक होता. जून 1841 च्या सुरुवातीला न्यूझीलंड कंपनीच्या अभ्यास पाहणीच्या दौर्यावर असताना त्यांनी छोटी सरोवरे आणि गुलाबी-शुभ्र स्तरांना काही काळ भेट दिली. त्यांच्या 'ट्रॅव्हल्स इन न्यूझीलंड' या पुस्तकातील त्यांच्या भेटीच्या वर्णनामुळे गुलाबी आणि शुभ्र टेरेसेसमध्ये युरोपियनच नव्हे, तर जगभरातील पर्यटकांच्या मनात रस निर्माण झाला. गुलाबी-शुभ्र छते हे न्यूझीलंडचे सर्वात प्रसिद्ध पर्यटन आकर्षण बनले. तोपर्यंत न्यूझीलंड युरोपीय लोकांसाठी तुलनेने दुर्गम होता आणि जहाजाने जाण्यासाठी अनेक महिने लागत असत. ऑकलंड ते टॉरंगा हा प्रवास सामान्यत: स्टीमरने आणि इतर वाहनांच्या माध्यमातून आणि पायीदेखील करावा लागे. पर्यटक सकाळी 11 च्या सुमारास शुभ्र स्तरांवर पोहोचतील, तेथील प्रेक्षणीय स्थळे पाहतील, उकळत्या झर्यावर शिजवलेले बटाटे आणि कौरा (गोड्या पाण्यातील क्रेफिश) यांचे दुपारचे जेवण घेतील, गुलाबी टेरेसेस ओलांडतील, तेथे स्नान करतील आणि नंतर परत जातील, असे वर्णन चार्ल्स ब्लॉमफिल्डने केलेले आहे.
गुलाबी आणि पांढरे टेरेस स्प्रिंग्स सुमारे 3,900 फूट अंतरावर होते. शुभ्र स्तर रोटोमहाना सरोवराच्या उत्तर-पूर्व टोकाला होत्या आणि कैवाका वाहिनीच्या प्रवेशद्वारावर पश्चिमेकडून वायव्येकडे त्यांचे तोंड होते. गुलाबी टेरेस पश्चिमेकडील किनार्यावरील तलावाच्या अवघड वाटेने पूर्वेकडून आग्नेय दिशेला होते. मध्य आणि वरच्या खोर्यावर (इंद्रधनुष्य ट्राऊटच्या रंगासारखे) गुलाबी दिसणे हे अँटिमनी आणि आर्सेनिक सल्फाईडस्मुळे होते. याच गुलाबी टेरेसमध्ये असलेले सोन्याचे मोठे प्रमाण संशोधकांना साद घालत होते.
हे गुलाबी आणि शुभ्र स्तर पूर्वी सुमारे 1,000 वर्षे जुने मानले जात होते. पण नव्या संशोधनानुसार, ज्या हायड्रोथर्मल सिस्टमने हे स्तर मजबूत बनले; ते 7,000 वर्षांपर्यंत प्राचीन असू शकतात. सिलिका पर्जन्यामुळे कालांतराने अनेक पूल आणि पायर्या तयार झाल्या. जेव्हा थर्मलचे स्तर गिझरपासून दूर दुसर्या दिशेने वळतात, तेव्हा पृष्ठभागावर सिलिका पायर्या तयार होतात. हजारो वर्षे पडणार्या पावसाचाही या स्तरांच्या निर्मितीवर परिणाम झाला होता. कालांतराने दोन्ही प्रकारची निर्मिती वाढली कारण सिलिकाने भरलेले पाणी त्यांच्यावर सतत कोसळत राहिले. भूगर्भशास्त्रज्ञ फर्डिनांड फॉन हॉचस्टेटर यांनी या स्तरांना 1859 मध्ये भेट दिली. या स्तरांच्या निर्मितीसाठी नि:संशयपणे हजारो वर्षे लागली असावीत, असे निरीक्षण हॉचस्टेटर यांनी नोंदवलं. जेव्हा हे गुलाबी-शुभ्र स्तर अस्तित्वात होते, तेव्हा त्या खोर्यात दोन मोठे आणि सहा लहान जलाशय होते. त्यातल्या एका मोठ्या सरोवराचं नाव रोटोमाकारीरी असं होतं.
10 जून 1886 या दिवशी तरावेरा पर्वतावर ज्वालामुखीचा प्रचंड असा उद्रेक झाला आणि त्या उद्रेकात हे आठवं आश्चर्य नष्ट होऊन गेलं. सुमारे चाळीस किलोमीटरच्या परिसरात राखेचा थर पसरला. लाव्हा वितळून गुलाबी-शुभ्र स्तर त्याखाली गाडले गेले. खालच्या बाजूला जिथं लाव्हारस पसरला, त्या जागी लाव्हा थंड झाल्यावर त्या ठिकाणी पाणी साठत गेले आणि 'रोटोमहाना' हा तलाव निर्माण झाला. आता त्या ठिकाणी नव्यानं संशोधन सुरू झालेलं आहे. वितळलेल्या लाव्हारसाच्या 114 फूट खाली हे गुलाबी- शुभ्र स्तर असावेत, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. येथे सापडलेल्या राखेच्या संशोधनानुसार, हा उद्रेक बेसॉल्टिक स्फोटाची प्रक्रिया होती.