बहार विशेष : दडलेल्या विषाणूंचे महासंकट

बहार विशेष : दडलेल्या विषाणूंचे महासंकट
Published on
Updated on

जागतिक तापमानवाढीमुळे येणार्‍या भविष्यात हिमनद्या वितळल्याने लाखो टन जीवाणू आणि विषाणू या हिमनद्यांतून बाहेर पडतील, असे युरोपियन शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासात दिसून आले आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की, हवामानाच्या संकटामुळे बर्फ जलद वितळून अनेक जीवाणू आणि विषाणू एक तर नाहीसे होत आहेत किंवा ते बर्फातून समुद्राकडे वाटचाल करत आहेत. यामुळे जग कोरोनापेक्षाही महाभयंकर महामारीच्या विळख्यात अडकण्याची भीती आहे.

साधारणपणे दहा वर्षांपूर्वी फ्रान्समधील एक शास्त्रज्ञांची टीम अतिथंड वातावरणाचा जीवजंतूंवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी जगभर फिरत होती. युरोपमधील अनेक अतिथंड प्रदेशांतून शास्त्रज्ञांनी प्रवास करून रशियातील सायबेरियन भागामध्ये ते आले होते. सायबेरिया हा जगातील अतिथंड भागात गणला जातो आणि जवळपास 95 टक्के प्रदेशात अजूनही मनुष्य पोहोचू शकला नाही. या भागात त्या शास्त्रज्ञांनी जमिनीवरील बर्फाच्या थराचे आणि जमिनीपासून सुमारे 100 फूट खाली जिथेपर्यंत बर्फ आहे अशा ठिकाणचे काही नमुने घेतले आणि त्याच्यावर वैज्ञानिक प्रयोग सुरू केले. जमिनीपासून 100 फूट खालील जे नमुने घेतले होते, त्यामध्ये त्यांना काही जीवाणू आणि विषाणू सापडले, ते जीवजंतू निष्क्रिय अवस्थेत होते; पण त्यांनी जेव्हा प्रयोगशाळेत योग्य ते वातावरण निर्माण केले तेव्हा असे दिसून आले की, ते जीवाणू आणि विषाणू सक्रिय होऊ शकतात. त्यामधील काही जीवाणू आणि विषाणू फक्त सक्रियच नाही, तर संसर्गजन्यसुद्धा आहेत. म्हणजेच हे जीवाणू किंवा विषाणू एखाद्या मनुष्याच्या शरीरात गेले, तर त्यांच्यापासून एखादा नवीनच संसर्गजन्य रोग होऊ शकतो आणि त्यावर उपचार मात्र लवकर शोधला जाऊ शकणार नाही.

यामधील काही विषाणू तीस हजार वर्षांपासून त्या बर्फाखाली निपचित होते आणि त्यांच्यामुळे गेल्या हजारो वर्षांमध्ये मानवाला कोणताही धोका झाला नव्हता. त्याचवेळी या शास्त्रज्ञांनी जगाला इशारा दिला होता की, निसर्गात ज्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप झाला नाही अशा ठिकाणी हस्तक्षेप करू नका; अन्यथा जग पुन्हा एखाद्या महामारीमध्ये अडकून पडेल.

शास्त्रज्ञांनी दिलेली धोक्याची सूचना आता खरी होताना दिसून येत आहे. अद्यापही या धोक्याबाबतचे गांभीर्य जगभरात दिसून येत नाहीये; पण येणार्‍या भविष्यात आपल्याला याचे दूरगामी परिणाम दिसून येतील. अगदी अलीकडे चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटच्या परिसरात काही नवीनच विषाणू आणि जीवाणू सापडले आहेत. चीनने आपला महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प तिबेटच्या अनेक भागांत विस्तारित केला आहे. तिबेट हासुद्धा लाखो वर्षांपासून मानवी हस्तक्षेपापासून दूर राहिलेला प्रदेश आहे. लाखो वर्षांपासून बर्फ त्या ठिकाणी साचून राहिलेला आहे. या बर्फाखालीसुद्धा हजारो प्रकारचे जीवाणू आणि विषाणू निपचित अवस्थेत अजूनही आहेत. जानेवारी 2020 मध्ये यावरील काही वैज्ञानिक अहवाल प्रकाशित झाले. या अहवालांमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, तिबेटच्या ज्या भागामध्ये सध्या मानवी हस्तक्षेप जोरात सुरू आहे, अशा प्रदेशात 28 प्रकारचे विषाणू सापडले आहेत आणि हे विषाणू कमीत कमी पंधरा हजार वर्षांपासून बर्फाखाली निपचित पडलेले आहेत. अशाच प्रकारचे प्रयोग तिबेटमध्ये 1992 आणि 2015 मध्येही केले होते; पण त्यावेळी आधुनिक तंत्रज्ञान नसल्यामुळे नक्की ते जीवजंतू बर्फाखालील आहेत की जमिनीवरील आहेत, हे समजणे अवघड होते. मात्र, आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे विषाणू कधीचे आहेत किंवा ते नक्की संसर्गजन्य आहेत का नाहीत, हे समजणे अतिशय सोपे झाले आहे आणि त्यामुळेच ही नवीन माहिती जगासमोर आली आहे.

फक्त चीनचाच नाही, तर भारतीय उपखंडाच्या विचार केला, तर भारताच्या हद्दीत असणार्‍या हिमालयातसुद्धा हजारो प्रकारचे विषाणू आणि जीवाणू यांचा अधिवास लाखो वर्षांपासून आहे. अगदी अलीकडेच भारतातील प्रथितयश अशी विज्ञान संशोधन संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि निगाता युनिव्हर्सिटी, जपान यांनी संयुक्तरीत्या केलेल्या संशोधनामध्ये शास्त्रज्ञांना, सुमारे 600 दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या प्राचीन महासागरातून सोडलेल्या खनिजसाठ्यांमध्ये अडकलेल्या पाण्याचे थेंब सापडले आहेत. हिमालयात उंचावर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कार्बोनेट दोन्ही असलेल्या ठेवींचे विश्लेषण केल्यामुळे, पृथ्वीच्या इतिहासातील ऑक्सिजनची माहिती आता शास्त्रज्ञांना मिळू शकेल आणि या माहितीवरून हिमालयात वेगळे काही अजूनपर्यंत मानवाला माहीत नसलेले जीवाणू किंवा विषाणू यांचा सुगावा घेता येऊ शकतो.

येणार्‍या भविष्यात हिमनद्या वितळल्याने लाखो टन जीवाणू या हिमनद्यांतून बाहेर पडतील, असे युरोपियन शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासात दिसून आले आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की, हवामानाच्या संकटामुळे बर्फ जलद वितळणे म्हणजे हिमनद्या आणि त्यांनी आश्रय घेतलेली अद्वितीय सूक्ष्मजीव परिसंस्था आमच्या डोळ्यांसमोर मरत आहे, म्हणजेच अनेक जीवाणू आणि विषाणू या परिणामामुळे एक तर नाहीसे होत आहेत किंवा ते बर्फातून समुद्राकडे वाटचाल करत आहेत. हिमालयासारखेच इतर युरोप, अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी युरोप आणि उत्तर अमेरिकेतील आठ हिमनद्या आणि ग्रीनलँड बर्फाच्या टोपीवरील दोन ठिकाणांहून पृष्ठभागावर वितळलेले पाणी गोळा केले. त्यांना प्रत्येक मिलिलिटर पाण्यात हजारो सूक्ष्मजंतू आढळले. यामध्ये जीवाणू, विषाणू, बुरशी यांचा समावेश होता.

या जीवाणूंमुळे होणार्‍या संसर्गजन्य आजारांकडे आणि त्याच्यावरील संशोधनाकडे लक्ष दिले नाही, तर नजीकच्या भविष्यात हे आंतरराष्ट्रीय संकट ठरणार आहे. जर वेगवेगळ्या देशांतील राज्यकर्त्यांनी लवकरात लवकर, याकडे लक्ष दिले नाही तर काही दिवसांतच वेळ निघून जाईल, असे अनेक वैद्यकीय सूक्ष्मजीव विज्ञानाचे प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ यांचे म्हणणे आहे.

मार्च 2020 पासून एका विषाणूमुळे आलेला आजार हा एका लहान तीव्र भूकंपाप्रमाणे आहे, तर अँटिबायोटिक्सच्या प्रतिरोधकांमुळे येणारा भविष्यातील संसर्गजन्य रोग ही प्रचंड त्सुनामी असेल. लाखो रुग्णांवर जेव्हा एखादी शस्त्रक्रिया केली जाते, तेव्हा डॉक्टरांना सर्वात मोठी भीती ही जीवाणूमुळे होणार्‍या संसर्गाची असते आणि असा संसर्ग होऊ नये म्हणून त्या रुग्णाला अँटिबायोटिक्स घ्यावी लागतात. नजीकच्या भविष्यात जेव्हा ही अँटिबायोटिक्स निरुपयोगी होतील, तेव्हा शस्त्रक्रिया झाल्यानंतर जो संसर्ग होतो तो आपण रोखू शकणार नाही आणि वेगवेगळ्या आजारांवर शस्त्रक्रिया होणार्‍या लाखो रुग्णांसाठी ते प्राणघातक असेल, यामध्ये सर्वाधिक मृत्यू कॅन्सर आणि मधुमेहसारखे आजार होणार्‍या रुग्णांचे असतील.

हा प्रश्न अजून जटिल होऊ नये म्हणून हिमालयीन देशांनी म्हणजेच भारत, चीन, नेपाळ, भूतान आणि पाकिस्तान या देशांनी हिमालयातील ज्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप झाला नाही, अशा ठिकाणी अधिक खबरदारी आणि नियमावली केली पाहिजे. कारण, हिमालयामध्येसुद्धा हजारो प्रकारचे जीवाणू आणि विषाणू तसेच अनेक प्रकारच्या बुरशी लाखो वर्षांपासून बर्फाखाली निर्जीव अवस्थेत आहेत. मानवी हस्तक्षेपामुळे त्यांचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा धोका रोखायचा असेल, तर या देशांमध्ये अशाप्रकारची वैज्ञानिक जनजागृती करायला हवी, राजकीय आणि प्रशासकीय लोकांना याची गंभीरता पटवून दिली पाहिजे. जगातील सर्वच देशांनी घनदाट जंगलातील, पर्वतातील, नदीतील, बर्फातील आणि वाळवंटातील मानवी हस्तक्षेप रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, तरच आपण भूतकाळापासून होणारा भविष्यातील धोका टाळू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news