Babanrao Dhakne: बबनराव ढाकणे यांचे संघर्षमय जीवन प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Babanrao Dhakne
Babanrao Dhakne
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: सर्वसामान्यांसाठी जनकैवारी म्हणून परिचीत, लोकहिताकरिता संघर्षासाठी सदैव सज्ज असे नेतृत्व माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. (Babanrao Dhakne)

शोकसंदेशात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, 'विद्यार्थी चळवळीतून आपल्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीस सुरुवात करीत त्यांनी राज्याच्या व देशाच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले. गोवा मुक्तिसंग्रामातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. एक संघर्षशील आणि आक्रमक राजकीय नेता म्हणून त्यांची ओळख होती. ऊसतोडणी कामगारांचे नेते म्हणून त्यांनी कामगारांचे प्रश्न हिरीरीने मांडले. बाजार समितीच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दीला प्रारंभ करून थेट केंद्रीय मंत्री पदापर्यंत मजल मारली. (Babanrao Dhakne)

जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर, विशेषतः दुष्काळावरील उपाययोजनांसाठी त्यांनी केलेला संघर्ष हा राजकारण आणि समाजकारणात येणाऱ्या पुढील पिढीसाठी निश्चितच मार्गदर्शक राहील. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्तीमत्वास मुकलो आहोत. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो तसेच त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना, या भावनांसह मुख्यमंत्र्यांनी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सर्वसामान्यांसाठी लढणारा संघर्षयोद्धा हरपला; उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई पुढारी वृत्तसेवा: "माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे हे समाजातील गरीब, वंचित, दुर्बल घटकांच्या विकासासाठी लढणारं नेतृत्वं होतं. ऊसतोड कामगारांसाठी त्यांनी जीवनभर संघर्ष केला. विद्यार्थी चळवळीतून समाजकारणात सक्रिय असलेल्या ढाकणे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाजाची चिंता केली. बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, विधान परिषदेचे सदस्य, लोकसभेत खासदार, राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदापर्यंत अनेक जबाबदाऱ्या सांभाळतांना प्रत्येक पदाला न्याय दिला.

बबनराव ढाकणे हे लढाऊ नेतृत्वं होतं. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी संघर्ष केला. त्यांचं जीवन हे राजकीय, सामाजिक जीवनात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी आहे. त्यांच्या निधनानं संघर्षयोद्धा हरपला आहे. सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. बबनराव ढाकणे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बबनराव ढाकणे साहेबांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news