

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना उपनेते आणि शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख माजी मंत्री बबन घोलप यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी नाकारला आहे. यासंदर्भात पुन्हा दोन दिवसानंतर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून बबन घोलप हे इच्छुक आहेत. आगामी २०२४ च्या निवडणुकीसाठी ते तयारीत आहेत, पंरतु या मतदारसंघातून भानुदास वाकचौरे यांना शिवसेना ठाकरे गटाने प्रवेश दिला. त्यामुळे घोलप यांच्या उमेदवारीबाबत शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे नाराज झालेल्या घोलप यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सादर केला होता. घोलप यांच्या या भुमिकेमुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. घोलप यांच्या नाराजीची मातोश्रीवरुन तत्काळ दखल घेण्यात आली. घोलप यांना चर्चेसाठी सोमवारी (दि. ११) मातोश्रीवर पाचारण करण्यात आले होते. त्यांची खासदार संजय राऊत यांच्याबरोबर चर्चा झाली. त्यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी नाकारला असून दोन दिवसांत पुन्हा चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या चर्चेप्रसंगी उत्तर नगरचे जिल्हाप्रमुख प्रमोद लभडे तसेच भारत मोरे, संदीप आयनोर आदी उपस्थित होते.