

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : विदेशी लोकांसाठी केंद्र सरकारने आयुष व्हिसाची सुविधा उपलब्ध केली असल्याची माहिती आयुष मंत्रालयाचे मंत्री एस. सोनोवाल यांनी दिली. या सुविधांमुळे 2025 पर्यंत आयुष आरोग्य क्षेत्रातील आर्थिक उलाढाल 70 अब्ज डॉलरपर्यंत जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षीच आयुष व्हिसा सुरू करण्याबाबत सुतोवाच केले होते. योगा, आयुर्वेदासारख्या प्राचीन औषधशास्त्राचा जगभर प्रसार व्हावा, अशी पंतप्रधानांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे विदेशी नागरिकांना भारतात आयुषअंंतर्गत उपचार करता यावेत, यासाठी त्यांना देशात प्रवेश करताना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये, यासाठी आयुष व्हिसाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सोनोवाल यांनी दिली.
आयुष आणि भारतीय औषधक्षेत्रासाठी हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. भारतातच बरे व्हा (हील इंडिया) या उपक्रमांतर्गत आयुष व्हिसा विदेशी नागरिकांना देण्यात येणार आहे. जेणेकरून नजीकच्या काळात वैद्यकीय सुविधांसाठी भारत जगासाठी महत्त्वाचे केंद्र ठरेल. त्या अनुषंगाने देशातील पर्यटन वाढीलाही चालना मिळेल,असा विश्वास सोनोवाल यांनी व्यक्त केला.
मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल या क्षेत्रात नजीकच्या काळात मोठ्या संधी निर्माण होतील. ग्लोबल वेलनेस इकॉनॉमीचा विचार केल्यास यामध्ये भारतात वार्षिक 9.9 टक्क्याने विकास वृद्धी होईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
असा असेल आयुष व्हिसा
चाप्टर 11 ए आयुष व्हिसा अशा श्रेणीमध्ये हा मेडिकल व्हिसा विदेशी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या चाप्टर 11 नुसार वैद्यकीय व्हिसा दिला जातो. आयुषअंंतर्गत वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी भारतात येऊ इच्छिणार्या विदेशी नागरिकानाच हा व्हिसा दिला जाईल.