बालकाण्ड भाग ५ : शिवधनुर्भंग

बालकाण्ड भाग ५ : शिवधनुर्भंग
Published on
Updated on

(संकलन : सुरेश पवार)

श्रीरामाने अहल्येचा उद्धार केला. त्यानंतर महातपस्वी विश्वामित्र यांच्याबरोबर श्रीराम, लक्ष्मण, मुनीजन यांनी गौतम आश्रमातून जनक राजाच्या यज्ञ मंडपाकडे प्रस्थान केले. राजर्षी विश्वामित्र यांचे यज्ञ भूमीनजीक आगमन झाल्याचे वर्तमान राजा जनकाला समजले. तत्काळ तो आपले पुरोहित शतानंद यांना बरोबर घेऊन महर्षी विश्वामित्र यांच्या स्वागतासाठी त्यांना सामोरा गेला. ब्रह्मर्षी विश्वामित्र आणि त्यांच्या समवेतच्या परिवाराचे यथाविधी स्वागत करून त्याने विश्वामित्रांना उच्चासन स्वीकारण्याची नम्र विनंती केली. श्रीराम आणि लक्ष्मण यांच्याविषयी राजा जनकाच्या मनात कुतूहल दाटून आले होते. हे महापराक्रमी कुमार कोण म्हणून राजाने विश्वामित्रांकडे प्रश्न केला. तेव्हा महर्षी विश्वामित्रांनी त्यांची माहिती दिली. राजा दशरथाचे हे सुपुत्र असून, श्रीरामाने मारीच, सुबाहु आदी राक्षसांचे पारिपत्य केले आहे, अशी हकिकत त्यांनी राजा जनकाला सांगितली. श्रीरामाचे हे अद्भुत पराक्रम ऐकून राजा जनक प्रसन्न झाला. त्यानंतर त्याने नम्र भावाने ब्रह्मर्षी विश्वामित्र आणि परिवाराचा निरोप घेतला. उदर्हक प्रात:काली यज्ञभूमीवर येण्याची विनंती करून तो स्वस्थानी गेला.

दुसर्‍यादिवशी प्रात:काली राम-लक्ष्मणासह ब्रह्मर्षी विश्वामित्र जनकाकडे गेले. राजा जनकाने यथाविधी पूजन करून त्यांचे स्वागत केले. तेव्हा विश्वामित्र म्हणाले, "हे राजा, हे दोघे कुमार जगद्विख्यात क्षत्रिय आहेत. महातेजस्वी राजा दशरथ यांचे ते सुपुत्र आहेत. तुझ्यापाशी श्रेष्ठ असे शिवधनुष्य आहे. ते पाहण्याची त्यांची उत्कट इच्छा झाली आहे."

यावर प्रसन्न चित्ताने राजा जनकाने या महान धनुष्याची कथा सांगितली. राजा म्हणाला, "आमच्या कुळात देवरात हा महान राजा होऊन गेला. तो निमीचा ज्येष्ठ पुत्र. पूर्वी दक्ष प्रजापतीने यज्ञ केला. मात्र, दक्षाने देवाधिदेव महादेवाला आमंंत्रण दिले नाही आणि श्री शंकराची पत्नी सती हिचाही अवमान केला. सतीने यज्ञात उडी घेतली आणि आपले जीवन संपवले. तेव्हा शिवशंकर क्रोधाविष्ट झाले. त्यांनी रुद्राला पाठवले. रुद्राने यज्ञाचा विध्वंस केला आणि रुद्राने आपल्याकडील महाशक्तिशाली शिवधनुष्य आकर्ण प्रत्यंचा ताणून उपस्थित देवांवर रोखले. त्यामुळे सार्‍या देवांची गाळण उडाली. त्यांनी श्रीशिवशंकराचा धावा केला. शिवशंकर प्रसन्न झाले. त्यांनी देवांना अभय दिले आणि हे शिवधनुष्य आमचे पूर्वज राजा निमी यांच्याकडे ठेव म्हणून दिले."

राजा जनक पुढे सांगू लागला, "हे ब्रह्मर्षी याप्रमाणे हे शिवधनुष्य आमच्या घराण्यात आले आहे. त्याला प्रत्यंचा लावण्याचे सोडाच, ते आतापर्यंत कोणी उचलूही शकलेले नाही. एकदा मी भूमी शुद्धीकरता जमीन नांगरीत असता, नांगरातून मला एक कन्या प्राप्त झाली. नांगरापासून निघाली म्हणून तिचे नाव 'सीता' असे ठेविले. शिवधनुष्य जो सज्ज करील, त्यालाच ही माझी कन्या द्यावयाची, असा माझा पण आहे."

त्यानंतर विश्वामित्रांच्या सांगण्यावरून ते महान शिवधनुष्य आणावयास सांगितले. एका आठ चाकी गाड्यावर मोठ्या लोखंडी पेटीत ठेवलेले ते महान धनुष्य पाच हजार सेवकांनी मोठ्या कष्टाने आणून ठेविले. ब्रह्मर्षी विश्वामित्रांनी रामाला ते धनुष्य पाहण्यास सांगितले. रामाने पेटी उघडली आणि मग रामाने अगदी सहज लीलेने ते धनुष्य उचलले. हजारो राजे पाहत असताना श्रीरामाने त्या दिव्य महाशक्तिमान शिवधनुष्याला सहजगत्या प्रत्यंचा चढविली. श्रीरामाने आकर्ण प्रत्यंचा ओढली. मात्र, वीज कडाडल्याप्रमाणे प्रचंड आवाज होऊन त्या धनुष्याचे दोन तुकडे झाले. त्या आवाजाने सारा आसमंत कंपित झाला आणि विश्वामित्र, राम-लक्ष्मण, जनक राजा वगळून उपस्थित हजारो लोक मूर्छित झाले. थोड्या वेळाने स्थिरस्थावर झाल्यावर धनुर्भंगाची हकिकत सर्वांना समजली. शिवधनुष्याला कोणी प्रत्यंचा लावू शकले नव्हते. ते अद्भुत कार्य रामाने केल्याचे समजताच आनंदोत्सव झाला. राजा जनक चिंतामुक्त झाला.

॥ जय श्रीराम ॥

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news