बालकाण्ड भाग ६ : श्रीराम-सीता विवाह

बालकाण्ड भाग ६ : श्रीराम-सीता विवाह
Published on
Updated on

(संकलन : सुरेश पवार)

जगद्विख्यात अशा महाशक्तिमान शिवधनुष्याला श्रीरामाने प्रत्यंचा लाविली आणि प्रत्यंचा आकर्ण ओढताच शिवधनुष्य भंगले. या अद्भुत प्रसंगाने राजा जनकाला श्रीरामाच्या अपार सामर्थ्याची प्रचिती आली आणि त्याने पूर्वी ठरल्याप्रमाणे आपली कन्या सीता हिचा विवाह श्रीरामाशी करून द्यायचे आपले मनोगत ब्रह्मर्षी विश्वामित्र यांच्याजवळ प्रकट केले.

राजा जनक लीन भावे विश्वामित्रांना म्हणाला, "अहो, शिव धनुर्भंगासारखे अद्भुत कर्म श्रीरामाच्या हातून होईल, अशी कल्पनाही मी केली नव्हती. हे कुशिकवंशज मुनिश्रेष्ठा, सीता वीर्य शुल्का म्हणून माझी प्रतिज्ञा होती. ती पूर्ण झाली. माझी प्राणप्रिय कन्या सीता रामाला द्यावयाची, हा निश्चय झाला. आपल्या अनुमतीने राजा दशरथाकडे माझ्या मंत्रिगणांना मी त्यांना घेऊन येण्यासाठी अयोध्येला पाठवतो. त्यांना इथे घेऊन येऊद्या."

महर्षी विश्वामित्रांनी संमती देताच जनक राजाचे ते मंत्री दूर पल्ल्याच्या मजला मारीत तीन दिवसांतच अयोध्यानगरीत पोहोचले. राजा दशरथाची त्यांनी भेट घेतली. त्याचे कुशल मंगल विचारले. त्यानंतर त्यांनी श्रीरामाने केलेल्या धनुर्भंगाचा पराक्रम निवेदन केला. राजा जनकने आपली कन्या सीता रामाला द्यावयाची निश्चित केल्याचे सांगितले आणि आपल्या पुरोहितांसह त्वरेने मिथिलेला यावे, अशी विनंती त्यांनी राजा दशरथाला केली. त्यावर राजा दशरथाने महर्षी वसिष्ठांसह मंत्रिगणाशी विवाहाविषयी विचारले, तेव्हा सर्वांनी अत्यानंदाने या संबंधाला रूकार दिला. लगेच दुसर्‍या दिवशी मिथिलेला प्रयाण करण्याचे ठरले.

त्याप्रमाणे वसिष्ठांसह ऋषी, चतुरंग सेनेसह मिथिलेकडे निघाले. त्यापाठोपाठ रथासह दशरथही निघाला. चार दिवसात ते विदेह देशाला पोहोचले. राजा जनकाने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यांचा आदरसत्कार केला. उदईक आपल्या यज्ञाची समाप्ती होत, ती झाल्यावर विवाहसोहळा करू, असे राजा जनकाने सुचवले. त्याला दशरथाने संमती दिली.

दुसर्‍या दिवशी प्रभातसमयी राजा जनकाने कुशध्वज नामक आपल्या तेजस्वी बंधूला बोलावून घेतले. त्यांनी मग दशरथला पाचारण केले. यावेळी पुरोहित महर्षी वसिष्ठ यांनी रघुकुळाचा इतिहास कथन केला. राजा जनकानेही आपला कुलवृत्तांत सांगितला आणि श्रीरामाला सीता आणि लक्ष्मणाला उर्मिला ही आपली कन्या देण्याचा मनोदय स्पष्ट केला. यावर ब्रह्मर्षी विश्वामित्रांनी, ही दोन्ही कुळे अद्वितीय अशीच असल्याचे सांगून, जनकाचा बंधू कुशध्वज याच्या दोन कन्यांचा भरत आणि शत्रुघ्न यांच्याशी विवाह व्हावा, असा मानस बोलून दाखविला. शुभविवाहाच्या या मंगल प्रस्तावांना सर्वांची हर्षभराने संमती प्राप्त झाली.

राजा दशरथाने नांदी श्राद्धासह सर्व विधी पार पाडले. ब्राह्मणांना गोदान दिले. त्याचदिवशी भरताचा मामा केकय राजाचा पुत्र युघाजित अयोध्येत आला. त्यालाही आपल्या भाच्याचा विवाह ठरल्याचे ऐकून आनंद झाला.

महर्षी आणि जनकाचा राजपुरोहित शतानंद यांना पुढाकार देऊन ब्रह्मर्षी वसिष्ठांनी विवाहाप्रीत्यर्थ यथाविधी वेदी तयार केली. वेदी गंधपुष्पांनी सुशोभित केली. वेदीवर विविध पवित्र पूजा साहित्य सिद्ध करण्यात आले आणि मग वेदीमध्ये अग्निची स्थापना करून महातपस्वी वसिष्ठांनी अग्निमध्ये हवन केेले. जनक राजाने सर्व अलंकार धारण केलेल्या सीतेला वेदीसमोर उभे केले आणि 'सहधर्मचारिणी म्हणून सीतेचे पाणिग्रहण कर' असे जनकाने रामाला सांगितले. जनकराजाने कन्यादानाचे समंत्रक उदक सोडताच, देव-ऋषींनी 'साधु – साधु,' असे आशीर्वचन दिले. पुष्पवृष्टी झाली. देवदुंदुभीचा ध्वनी झाला. राम-सीता यांच्या पाणिग्रहणानंतर लक्ष्मणाचा उर्मिलेशी, भरताचा मांडवीशी आणि शत्रुघ्नाचा ऋतकीर्तीशी विवाह संपन्न झाला. चारीही विवाह मोठ्या थाटामाटात पार पडले. या विवाहामुळे स्वर्ग लोकीही आनंदोत्सव झाला. अप्सरांचे नृत्य, गंधर्वांचे गायन, अशा अद्भुत वातावरणात या मंगल विवाहाची सांगता झाली.

॥ जय श्रीराम ॥

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news