AUSWvsINDW : मॅकग्राथची झुंजार खेळी, ऑस्ट्रेलियाची मालिकेत १ – ० ने आघाडी

AUSWvsINDW : मॅकग्राथची झुंजार खेळी, ऑस्ट्रेलियाची मालिकेत १ – ० ने आघाडी
Published on
Updated on

भारत आणि ऑस्ट्रेलिया ( AUSWvsINDW ) यांच्यातील महिला क्रिकेट संघातील दुसऱ्या टी २० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ४ विकेट्स राखून पराभव केला. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाने ३ टी २० सामन्यांच्या मालिकेत १ – ० अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून ताहलिया मॅकग्राथने  ३३ चेंडूत नाबाद ४२ धावांची झुंजार खेळी केली. भारताकडून राजेश्वरी गायकवाडने २१ धावात ३ विकेट घेत ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

भारतीय महिला संघाने ठेवलेल्या ११९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन महिला संघाची ( AUSWvsINDW ) सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात शिखा पांडेने अॅलिसा हेलेला ४ धावांवर बाद केले. त्यानंतर बेथ मूनी आणि मेग लेनिंग यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३१ धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला ६ षटकात ३३ धावांपर्यंत पोहचवले.

मात्र त्यानंतर राजेश्वरी गायकवाडने मेग लेनिंगला १५ धावांवर बाद करत इंग्लंडला दुसरा धक्का दिला. पाठोपाठ कर्णधार हरमनप्रीत कौरने चेंडू आपल्या हातात घेत अॅश्लेघ ग्रॅडनरला अवघ्या १ धावेवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या धक्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच दीप्ती शर्माने ऑस्ट्रेलियाला अॅलिस पेरीच्या रूपात चौथा धक्का दिला. पेरी अवघ्या २ धावांची भर घालून माघारी गेली.

राजेश्वरी गायकवाडने जोडी फोडली ( AUSWvsINDW )

एका बाजूने ऑस्ट्रेलियाची पडझड सुरु असताना बेथ मूनीने दुसरी बाजू लावून धरली. तिने सावध फलंदाजी करत संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. तिने ताहलिया मॅकग्राथबरोबर भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला सत्तरी पार करुन दिली. मात्र राजेश्वरी गायकवाडने बेथ मूनीला ३४ धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला पाचवा आणि मोठा धक्का दिला.

मूनी बाद झाल्यानंतर मॅकग्राथने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. तिने १६ व्या षटकात ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ८५ धावांपर्यंत पोहचवली. मात्र निकोला केरीने ७ धावांची भर घालून मॅकग्राथची साथ सोडली. त्यानंतर आलेल्या वॉरहेमने आक्रमक फलंदाजी करत धावा आणि चेंडू यातील अंतर कमी केले. दुसऱ्या बाजूने मॅकग्राथनेही आपला वेग वाढवत सामना ६ चेंडूत १ धाव असा जवळ आणला. अखेर मॅकग्राथने विजयी धाव घेत मालिकेत ऑस्ट्रेलियाला १ – ० अशी आघाडी मिळवून दिली. मॅकग्राथने ३३ चेंडूत ४२ धावांची झुंजार खेळी केली.

तत्पूवी, भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील ( AUSWvsINDW ) दुसऱ्या टी २० सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची गोलंदाज टायला व्लैमिकने पहिल्याच षटकात स्मृती मानधनला १ धावेवर बाद केले. त्यानंतर आपल्या पुढच्याच षटकात व्लैमिकने शेफाली वर्माला ३ धावांवर बाद करत भारताला दुसरा धक्का दिला.

या दोन धक्यातून संघाला सावरण्याचा प्रयत्न जेमिमाह रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कैरने केला. मात्र मोलिन्युक्सने पहिल्या टी २० सामन्यात दमदार फलंदाजी करणाऱ्या जेमिमाहला अवघ्या ७ धावात पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर कौर आणि यस्तिका भाटियाने संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले.

आक्रमक कौरकडूनही निराशाच ( AUSWvsINDW )

हरमनप्रीत कौर चांगल्या लयीत दिसत असतानाच वेअरहेमने कौरला २८ धावांवर बाद करत भारताला चौथा आणि मोठा धक्का दिला. कौैर बाद झाल्यानंतर अवघ्या २ धावातच यस्तिका भाटियाही धावबाद झाली. निम्मा संघ माघारी गेल्यानंतर डाव सावरण्यासाठी आलेल्या रिचा घोषलाही फारशी चमक दाखवता आली नाही. कॅरीच्या गोलंदाजीवर ती २ धावा करुन माघारी परतली.

पूजा वस्त्रकारने एकाकी लढवला  किल्ला ( AUSWvsINDW )

या वाताहतीनंतर दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्रकार यांनी भागीदारी रचत संघाला पंच्चाहत्तीरी पार करुन दिली. मात्र धाव घेण्याची घाई दीप्तीला महागात पडली. ती १६ धावांवर धावबाद झाली. त्यानंतर आलेल्या शिखा पांडे आणि रेणुका सिंह या दोघी प्रत्येकी १ धावेची भर घालून माघारी गेल्या.

अखेर पूजा वस्त्रकारने भारताला शंभरी पार करुन दिली. तिने अखेरच्या षटकात १६ धावा ठोकून भारताला २० षटकात ९ बाद ११८ धावांपर्यंत पोहचवले. तिने २६ चेंडूत नाबाद २७ धावांची झुंजार खेळी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news