

'हारकर जितनेवाले को बाजीगर कहते है…' हे बेन स्टोक्सने (Ben Stokes) अॅशेसच्या दुसर्या कसोटीत लॉर्डस्ला करून दाखवले. सामना भले ऑस्ट्रेलियाने जिंकला, पण बेन स्टोक्सने सर्वांची मने जिंकली. विजयाचे 371 धावांचे लक्ष्य चौथ्या डावात गाठणे हे जवळपास दुरापास्त होते, पण बेन स्टोक्सच्या झंझावातात हे लक्ष्य इंग्लंडच्या आवाक्यात दिसायला लागले होते. 2019 च्या हेडिंग्ले कसोटीत इंग्लंडला जिंकायला 359 धावा हव्या असताना बेन स्टोक्सने विजयश्री खेचून आणली होती. याच लॉर्डस्वर त्याने 2019 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या तोंडातून विश्वविजेतेपदाचा घास काढून घेतला होता. या दोन डावांची आठवण होईल, असे बेन स्टोक्स खेळत होता.
पाचव्या दिवसाची सुरुवात जेव्हा डकेट आणि स्टोक्सने केली तेव्हा त्यांचे इरादे स्पष्ट होते. त्यांना सामना वाचवायचा नव्हता तर बॅझबॉल क्रिकेटने त्यांना सामना जिंकायचा होता. दिवसाच्या पहिल्या तासातच त्यांनी 60 धावा काढून लक्ष्याच्या दिशेने उत्तम वाटचाल केली होती. ऑस्ट्रेलियाचा उसळत्या चेंडूचा मार्याचा रोख ठरलेला होता. हेजलवूडच्या उसळता चेंडू डकेटच्या ग्लोव्हजला चाटून गेला आणि यष्टिरक्षक कॅरीने अप्रतिम झेल घेऊन ही भागीदारी फोडली. जॉनी बेअरस्टोचा बळी इंग्लिश चाहत्यांच्या द़ृष्टीने वादग्रस्त, अखिलाडू वृत्तीचा होता, पण यात सर्वस्वी बेअरस्टोची चूक आहे.
क्रिकेटमध्ये एकदा नियमाच्या चौकटीत असले की सगळे योग्य असते तेव्हा त्याला अखिलाडू वृत्ती म्हणू शकत नाही. त्यातून आजकालच्या स्पर्धात्मक क्रिकेटच्या युगात नियमात बसणारे सर्व विजयासाठी वापरण्यात काहीच चूक नाही. एकेकाळी अखिलाडू वृत्ती म्हणून गणल्या जाणार्या मांकडिंगला अधिकृत मान्यता आहे तेव्हा चेंडू डेड होण्याच्या आत धावबाद करायला कुठचीच अडचण नको. अलेक्स कॅरीला व्हिलन ठरवण्यापेक्षा त्याच्या प्रसंगावधानाचे कौतुकच व्हायला हवे. ऑस्ट्रेलियाच्या द़ृष्टीने बेअरस्टोचा बळी महत्त्वाचा होता. स्टोक्स-डकेटच्या 132 धावांच्या भागीनंतर जर बेअरस्टोने स्टोक्सला साथ दिली असती तर इंग्लंडला विजयाची आशा होती.
बेअरस्टो बाद झाला तेव्हा इंग्लंडला जिंकायला अजून 178 धावा हव्या होत्या. त्या 2019 च्या हेडिंग्ले कसोटीत जोश बटलरचा इंग्लंडचा सहावा बळी गेला तेव्हा स्टोक्सपासून विजयाचे लक्ष्य 106 धावांवर होते म्हणजेच परवा लॉर्डस्ला जी परिस्थिती होती ती जास्त बिकट होती. यावर उपाय म्हणून अजून एकही बळी न जाऊ देता लवकरात लवकर हे लक्ष्य शंभरच्या आत आणणे होते. बेन स्टोक्सने (Ben Stokes) ग्रीनवर हल्लाबोल करत त्याच्या दोन षटकांत 38 धावा फाटकावत आपले इरादे स्पष्ट केले.
बेअरस्टो बाद झाल्यानंतरच्या फक्त 16 षटकांत स्टोक्स-ब्रॉड जोडीने 100 धावा जोडल्या. कसोटीत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांविरुद्ध 6 पेक्षा जास्त सरासरीने धावा काढणे स्टोक्सच्या फलंदाजीचा दर्जा दाखवून देते. या शतकी भागीदारीत ब्रॉडचा वाटा 11 धावांचा होता. या वादळी फलंदाजीने कांगारू आपली गोलंदाजीची लय घालवून बसले, त्याच्या हातातील झेल सुटायला लागले. आश्चर्य वाटते ते स्टोक्सची बहुतांशी फटकेबाजी ही मिडविकेट पट्ट्यात असते तेव्हा त्याला ऑफ स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकून रोखायचा प्रयत्न का झाला नाही? जेव्हा ऑस्ट्रेलियाने ते केले तेव्हा स्टोक्सला थोडा लगाम बसून तो बाद झाला. स्टोक्स बाद झाल्यावर इंग्लंडला जिंकणे कठीण होते.
प्रतिष्ठित मालिकेत पहिले दोन कसोटी सामने हरल्यावर पुन्हा मैदानात उतरून विजयाची अपेक्षा ठेवायला नवी उमेद लागते. ती उमेद द्यायचे काम स्टोक्सने काल केले. एक हाती सामना जवळजवळ फिरवणार्या या खेळीकडे बघून म्हणावेसे वाटते, पराभव व्हावा तर असा आणि कर्णधार असावा तर ऐसा..