Australia Team World Cup: वनडे वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा

Australia Team World Cup: वनडे वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Australia Team World Cup : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2 महिन्यांनंतर सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी 18 संभाव्य खेळाडूंची निवड केली आहे. यात फिरकीपटू तनवीर संघा आणि अष्टपैलू अॅरॉन हार्डी या नवख्यांना संधी दिली आहे. दोघांच्या निवडीने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर कसोटी संघातील स्टार मार्नस लॅबुशेनला संघात स्थान न मिळाल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

संघाचे कर्णधारपद कमिन्सकडे राहील. कमिन्स अजूनही दुखापतग्रस्त असला तरी विश्वचषकापर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा आहे. हा संघ विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि भारताचा दौरा करणार आहेत. कमिन्स दक्षिण आफ्रिकेसोबतच्या टी-20 मालिकेत दिसणार नाही, पण एकदिवसीय मालिकेपूर्वी संघात सामील होईल.

भारतात 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकप सुरू होणार आहे. यासाठी इतके संघ सज्ज झाले आहेत. प्रत्येक संघात 15 खेळाडू असतील, तसेच ते 3 स्टँडबाय खेळाडूंची नावे देखील देवू शकतात. विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व देशांना 28 सप्टेंबरपर्यंत अंतिम यादी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) द्यावी लागणार आहे.

तनवीर संघाचे वडील मूळचे पंजाबचे (Australia Team World Cup)

भारतीय वंशाचा अनकॅप्ड लेगस्पिनर तनवीर संघाचा 18 सदस्यीय ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला आहे. 21 वर्षीय संघचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला. तन्वीरचे वडील जोगा संघा हे जालंधरजवळील रहिमपूर या गावचे आहेत. 1997 मध्ये ते ऑस्ट्रेलियात शिकण्यासाठी गेले आणि नंतर सिडनीजवळ स्थायिक झाले. तन्वीरचे वडील सिडनीमध्ये टॅक्सी चालक म्हणून काम करतात तर आई उपनीत या सिडनीमध्ये अकाउंटंट म्हणून काम करतात.

तनवीरची निवड आश्चर्यकारक (Australia Team World Cup)

तनवीर संघा याचा वर्ल्डकपच्या संभाव्य खेळाडूंमध्ये समावेश होणे आश्चर्यकारक असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. कारण 21 वर्षीय संघा गेल्या सप्टेंबरपासून क्रिकेटपासून दूर आहे. कॉफ हार्बर येथे घरच्या सामन्यादरम्यान त्याच्या पाठीला फ्रॅक्चर झाले, त्यानंतर तो कोणताही देशांतर्गत सामना खेळला नाही.

हार्डी मार्श, ग्रीन, स्टॉइनिस आणि अॅबॉट यांच्याशी स्पर्धा करेल

अॅरॉन हार्डीने लिस्ट ए सामन्यांमध्ये 24 च्या सरासरीने 194 धावा केल्या आहेत आणि 15 बळी घेतले आहेत. हार्डी हा अष्टपैलू खेळाडू आहे. तो एक मध्यम वेगवान गोलंदाज आहे. मिचेल मार्श, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस आणि शॉन अॅबॉट यांचा संभाव्य खेळाडूंसह संघात समावेश करण्यात आला आहे.

अॅशेस मालिकेदरम्यान पॅट कमिन्सला दुखापत (Australia Team World Cup)

इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेदरम्यान वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सच्या मनगटात फ्रॅक्चर झाले होते. डॉक्टरांनी त्याला 6 आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला होता. विश्वचषकापूर्वी तो तंदुरुस्त होईल, अशी आशा आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत दौऱ्यावर तो एकदिवसीय संघाचे नेतृत्व करेल.

भारतीय दौऱ्यासाठी लबुशेनचा संघात समावेश होता

या वर्षी मार्चमध्ये भारतीय दौऱ्यावर झालेल्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात लबुशेनचा समावेश करण्यात आला होता. लबुशेनची वनडेतील कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. त्याने 30 एकदिवसीय सामन्यांमध्ये 31.37 च्या सरासरीने 847 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे.

वनडे वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियन संघ :

पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, अॅरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस , डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news