

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमधील कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांची शनिवारी रात्री उशिरा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने उत्तर प्रदेशमध्ये खळबळ माजली आहे. संपूर्ण राज्यात हाय अर्लट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती दोन महिन्यांमध्ये आपला अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे.
अतिक अहमद आणि अश्रफ अहमद यांच्या हत्येप्रकरणी तीन सदस्यीय न्यायालयीन चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती दोन महिन्यांत आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे. या समितीचे अध्यक्ष अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अरविंद कुमार त्रिपाठी असतील. तसेच निवृत्त आयपीसी अधिकारी सुरेश कुमार सिंग आणि निवृत्त जिल्हा न्यायाधीश ब्रिजेश कुमार सोनी यांचाही या समितीमध्ये समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या चौकशीत तिघांनीही आपल्याला मोठे माफिया बनायचे असल्याचे सांगितले आहे. त्यामुळेच त्याने ही घटना घडवली. तिन्ही मारेकऱ्यांनी विचारले की, ते किती दिवस किरकोळ शुटर राहायचे, या विचारातून अतिक आणि अश्रफ यांची हत्या करुन आपलं गुन्हेगारी जगतामध्ये मोठे नाव करण्यासाठी त्यांनी दोघांची हत्या केल्याची कबुली दिली आहे.