

दिब्रुगड : अनेक टेक कंपन्यांच्या संस्थापकांनी लहान वयातच चमकदार कामगिरी करून दाखवत श्रीमंतीही मिळवलेली आहे. आता काही भारतीयांचेही नाव अशा लहान वयात मोठी कमाई करणार्यांमध्ये येत आहे. किशन बगरिया या 26 वर्षीय तरुण चारशे कोटींचा मालक आहे, असं सांगितल्यास तुमचा विश्वास बसणार नाही. आसाममधील दिब्रूगड येथून सुरू झालेला किशनचा प्रवास सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचा तरुण उद्योजकापर्यंत पोहोचला आहे. वेगवेगळ्या गोष्टींबद्दल उत्सुकता असल्याने संशोधन करणारा तरुण म्हणून किशनने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील धडपड सुरू केली. केवळ इंटरनेट आणि कॉम्प्युटरच्या मदतीने सुरू झालेल्या या प्रवासामध्ये त्याने विंडोजच्या अॅप्लिकेशनमध्ये अनेक प्रयोग स्वत:च केले. याच प्रयोगांमधून त्याने यश मिळवलं आहे. किशनची यशोगाथा ही ध्येयवादाच्या जोरावर डिजिटल साक्षरतेचा योग्य वापर करून यश मिळवता येतं याचा पुरावा आहे.
किशनने त्याच्या वेगवेगळ्या प्रयोगांदरम्यान त्याने टेक्स्टस् डॉट कॉमची निर्मिती केली. टेक्स्टस् डॉट कॉम या मेसेजिंग अॅप्लिकेशनमध्ये वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरील मेसेज एकाच जागी दिसतात. व्हॉटस्अॅप, इन्स्टाग्राम आणि ट्विटरसारख्या वेगवेगळ्या माध्यमांवरील मेसेज एकाच ठिकाणी पाहता येण्याची सोय या अॅप्लिकेशनच्या एकाच इंटरफेसवर उपलब्ध आहे. या अॅपमध्ये एण्ड टू एण्ड इन्स्क्रीप्शन, प्रायव्हसी आणि सुटसुटीतपणा यासारखी वैशिष्ट्ये असल्याने ते वापरण्यास सुरक्षित आहे.
किशनने निर्माण केलेलं हे अॅप अमेरिकेतील ऑटोमॅटिक नावाच्या कंपनीला एवढं पसंत पडलं की, त्यांनी टेक्स्टस् डॉट कॉमसाठी तब्बल 50 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 400 कोटी रुपये मोजले. जगप्रसिद्ध वर्ल्डप्रेस डॉट कॉम हेसुद्धा ऑटोमॅटिक कंपनीच्या मालकीचं आहे. या कंपनीनेच किशनच्या या नव्या प्लॅटफॉर्ममधील क्षमता ओळखून ते 400 कोटींना विकत घेतलं आहे. एवढ्या मोठ्या किमतीला हे अॅप विकत घेण्याची तयारी कंपनीने दाखवली यावरुनच त्याचा साधेपणा, वैशिष्ट्य आणि उपयोग किती आहे हे अधोरेखित होतं.
वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरील मेसेजेस एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणार्या या प्लॅटफॉर्मला भविष्यात सुगीचे दिवस येणार आहेत असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. ऑटोमॅटिकच्या नेतृत्वाखाली आता किशन टेक्स्टस् डॉट कॉमच्या टीमचा प्रमुख झाला आहे. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सचं अधिक इंटिग्रेशन करून युझर इंटरफेस अधिक सुटसुटीत कसा करता येईल यावर सध्या तो काम करत असून, जागतिक स्तरावर हा प्लॅटफॉर्म गेमचेंजर ठरू शकतो. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होणारी माहितीची देवाणघेवाण सर्वांना सहज सोपी होईल, अशी आणि सुरक्षित असावी असा किशनचा प्रयत्न आहे. भविष्यात किशन त्याने निर्माण केलेल्या प्लॅटफॉर्म अधिक फिचर्स आणू इच्छितो ज्या माध्यमातून आधुनिक मेसेजिंगच्या क्षेत्रात नवीन बदल पाहायला मिळतील.