

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय (HS Prannoy) याने गुरुवारी पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत तीन गेमच्या रोमहर्षक सामन्यात मलेशियाच्या ली झिया जियाचा पराभव करून भारतासाठी बॅडमिंटन पदक निश्चित केले. जागतिक क्रमवारीत 7व्या स्थानावर असलेल्या प्रणॉय सध्या पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. मात्र, त्याने आपले दुखणे बाजूला ठेवत जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. 78 मिनिटे चाललेल्या या लढतीत भारतीय शटलरने 21-16, 21-23, 22-20 असा विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली.
यापूर्वी 1982 मध्ये दिल्लीत झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सय्यद मोदी यांनी बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर तब्बल 41 वर्षे भारत या क्रीडा प्रकारात पदक जिंकू शकला नव्हता. पण हँगझोऊ येथील स्पर्धेत प्रणॉयने (HS Prannoy) बॅडमिंटनच्या एकेरीतील पदकाचा दुष्काळ संपुष्टात आणला आहे. दुखापतीशी झुंज देत प्रणॉयने निर्णायक गेममध्ये दोन मॅचपॉइंट वाचवले आणि सलग चार गुणांसह गेम आणि सामना जिंकला. सामन्यानंतर प्रणॉयने आपली जर्सी काढली तेव्हा त्याच्या पाठीवर अनेक टेप दिसत होत्या.
प्रणॉयने (HS Prannoy) सामना जिंकताच तो जमिनीवर झोपला. त्याने जमिनीवर हात आपटून आनंद व्यक्त केला. यानंतर त्याने प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांना मिठी मारली. यावेळी गोपीचंद खूपच भावूक दिसत होते. गोपीचंद फार कमी प्रसंगी इतके भावूक दिसले आहेत. हे वर्ष प्रणॉयसाठी खूप खास ठरले आहे.
दुसरीकडे दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूच्या रुपाने भारताला मोठा धक्का बसला. उपांत्यपूर्व फेरीत तिचा चीनच्या खेळाडूने 16-21, 12-21 असा सरळ गेममध्ये पराभव केला. याचबरोबर सिंधूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये बिंगजियाओला सरळ गेममध्ये पराभूत करून कांस्यपदक जिंकले होते, परंतु चीनच्या खेळाडूने आपल्या मातीत विजय मिळवून बदला घेतला आणि गेल्या दोन आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकांचा रंग सुधारण्याची भारतीय खेळाडूची संधी हिरावून घेतली. सिंधूने 2014 इंचॉन आणि 2018 जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत अनुक्रमे कांस्य आणि रौप्य पदक जिंकले होते.