WMO Climate Report | आशियाई देशांना २०२३ मध्ये नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक फटका; WMO चा अहवाल

WMO Climate Report
WMO Climate Report
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक स्तरावर आशिया खंड हा हवामान, हवामानबदल आणि पाण्याशी संबंधित नैसर्गिक घटनांचे हॉटस्पॉट बनत आहे. यामध्ये महापूर, वादळ, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटा अशा गंभीर नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षी सन 2023 मध्ये जगातील इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा आशिया खंडातील देशांना सर्वाधिक हवामान आपत्तींचा सामना करावा लागला आहे. यामुळे आशियाचा बहुतांशी प्रदेश हा आपत्तीग्रस्त बनला आहे. या संदर्भातील माहिती जागतिक हवामान संघटनेने (WMO) त्यांच्या अहवालात दिल्याचे वृत्त 'डाउन टू अर्थ' दिले आहे. (WMO Climate Report)

जागतिक हवामान संघटनेने (WMO) प्रसिद्ध केलेल्या 'स्टेट ऑफ द क्लायमेट इन एशिया' हा नवीन अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. अहवालातील आकडेवारीनुसार, 2023 मध्ये आशिया खंडाला 79 अत्यंत गंभीर हवामान आपत्तींचा सामना करावा लागला. या आपत्तींनी आशिया खंडातील 2,000 हून अधिक लोकांचा बळी घेतला. या आपत्तींमुळे 90 लाखांहून अधिक लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले. जागतिक हवामान संघटनेने (WMO) जारी केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. (WMO Climate Report)

WMO Climate Report : सन 2023 मध्ये भारतात उष्माघाताने 110 जणांचा मृत्यू

सन 2023 मध्ये भारतात एप्रिल आणि जूनमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटांमुळे सुमारे 110 मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे, असे जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) स्टेट ऑफ द क्लायमेट इन एशिया – 2023 च्या अहवालात म्हटले आहे. तसेच वायव्य पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान विक्रमी उच्चांकावर पोहोचले आणि आर्क्टिक महासागरानेही सागरी उष्णतेची लाट अनुभवल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. (WMO Climate Report)

1991 ते 2020 च्या तुलनेत 2023 मध्ये सरासरी तापमानात वाढ

WMO ने अहवालात असेही म्हटले आहे की, वाढत्या तापमानामुळे उष्णतेच्या लाटेचा प्रभाव पूर्वीपेक्षा अधिक तीव्र झाला आहे. वाढत्या तापमानाशी संबंधित डेटा पाहिल्यास, 1991 ते 2020 च्या तुलनेत 2023 मध्ये आशियाचे सरासरी तापमान 0.91 अंश सेल्सिअसने वाढल्याचे नोंदवले गेले. ज्यामुळे 2023 हे जगभरातील दुसरे सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे. 2023 मध्ये, जपानने आतापर्यंतच्या सर्वात उष्ण उन्हाळ्याचा सामना केला असल्याचेही WMO च्या अहवालात नमूद केले आहे.

जगभरातील सरासरीपेक्षा आशियाचे तापमान वेगाने वाढतंय

आशियातील तापमान जागतिक सरासरीपेक्षा खूप वेगाने वाढत आहे. 1961 ते 1990 या कालखंडावर नजर टाकली तर या प्रदेशात तापमान वाढण्याची प्रवृत्ती जवळपास दुप्पट झाली आहे. आकडेवारीनुसार, 2023 मध्ये आशियामध्ये नोंदवलेले सरासरी तापमान 1961 ते 1990 च्या सरासरी तापमानापेक्षा 1.87 अंश सेल्सिअस जास्त असल्याचे दिसून येते. हवामानातील बदलांवर प्रकाश टाकत या अहवालात पृष्ठभागाचे तापमान, हिमनदी वितळण्याचे प्रमाण आणि समुद्राची पातळी झपाट्याने वाढत असल्याचेदेखील नमूद केले आहे. या बदलांचा आशियातील लोकांवर, अर्थव्यवस्थेवर आणि परिसंस्थेवर खोलवर परिणाम होईल, असेही अहवालात म्हटले आहे.

भारत धोक्याच्या बाहेर नाही, 2023 मध्ये अनेक संकटांना तोंड दिले

अहवालात 2023 मध्ये भारतात येऊ शकणाऱ्या हवामान आणि अत्यंत गंभीर हवामान आपत्तींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. ऑगस्ट 2023 मध्ये भारताने विक्रमी तापमान अनुभवले. तसेच याच महिन्यात पावसातही अनपेक्षित घट दिसून आली. भारतात 2023 मध्ये उशीरा सुरू झालेला कमकुवत मान्सून अनुभवायला मिळाला. त्यात सरासरीपेक्षा 94 टक्के पाऊस पडला (1971 ते 2020 पर्यंतचा हा सरासरी पाऊस होता)

चक्रीवादळ, पुरामुळे अनेक लोकांचे बळी

दक्षिण-पश्चिम भारतातील काही भाग, गंगा पाणलोट क्षेत्र आणि ब्रह्मपुत्रेच्या खालच्या भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्याचे हे सलग दुसरे वर्ष होते. 2023 मध्ये, 'टायफून' हे चक्रिवादळ आणि आकाशीय आपत्तीने भारतात 1,200 लोकांचा बळी घेतला. दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशला धडकणाऱ्या 'मिचॉन्ग' चक्रीवादळाचाही या अहवालात उल्लेख करण्यात आला आहे. हे चक्रीवादळ 5 डिसेंबर 2023 रोजी आंध्र प्रदेशात धडकले. या वादळाने 22 जणांचा बळी घेतला होता. त्याच वेळी, जून ते जुलै 2023 दरम्यान देशाच्या विविध भागांमध्ये पूर आणि वादळाच्या घटनांमध्ये किमान 599 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे, देशातील अनेक राज्ये ऑगस्ट 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात पूर आणि भूस्खलनाने प्रभावित झाली होती. त्यामुळे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 25 जणांचा मृत्यू झाला आहे.

भारतातील 'ही' राज्य उष्णतेच्या लाटेमुळे सर्वाधिक प्रभावित

2023 मध्ये आशियातील अनेक भागांना भीषण उष्णता आणि उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. उन्हाळ्याच्या सुरुवातीला दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियातील प्रदीर्घ उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले होते. भारतही या घटनांपासून दूर राहिला नाही. भारतात एप्रिल आणि जून महिन्यात अति उष्मा आणि उष्णतेच्या लाटेमुळे 110 लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाला. अहवालानुसार, 1991 ते 2020 या कालावधीतील सरासरी तापमानाशी तुलना केल्यास, पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये पृष्ठभागाजवळील तापमान एक अंश सेल्सिअसने वाढले होते. या भागात अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, जम्मू काश्मीर, लडाख आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल, बिहार, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि झारखंडच्या काही भागांचा समावेश आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे 20 लाख बळी, 6.4 कोटींहून अधिक लोक बाधित

युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन (UN ESCAP) ने देखील आपल्या अलीकडील अहवाल "Asia Pacific Disaster Report 2023" मध्ये उघड केले आहे की 1970 पासून आशिया-पॅसिफिक प्रदेशात सुमारे 20 लाख लोक आपत्तींचे बळी ठरले आहेत. इतकेच नाही तर या आपत्तींमध्ये 6.4 कोटींहून अधिक लोक बाधित झाले आहेत, असेदेखील या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news