Punjab : रुग्णालयाने दाखल न करून घेतल्याने महिलेला जमिनीवरच द्यावा लागला बाळाला जन्म

New Baby
New Baby
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : गर्भवती महिलेला प्रसुती वेदना सुरू असताना तिला रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे तिला रुग्णालयाच्या आवारात जमिनीवरच बाळाला जन्म द्यावा लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला असून पठाणकोट येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील हा प्रकार आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली आहे. या असंवेदनशील प्रकारावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

वायरल व्हिडिओ क्लिपमध्ये ती महिला तिच्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीसह जमिनीवर पडलेली दिसत आहे. कथित व्हिडिओमध्ये पीडित महिलेच्या पतीने कर्मचाऱ्यांवर त्यांना लेबर रूममधून बाहेर हाकलण्याचा आरोप केला आहे. हा व्हिडिओ अन्य रुग्णांनी शूट केला होता. रुग्णालयाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने (SMO) गर्भवती महिलेला दाखल करण्यास नकार दिल्याचा आरोप व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीनेही केला आहे.

घटनेची अधिक माहिती अशी की पठाणकोटमधील पिपली मोहाला येथील जंगी लाल (51) या मजुराने तिच्या गर्भवती पत्नीला 108-अ‍ॅम्ब्युलन्स सेवेचा वापर करून रुग्णालयात आणले. त्यावेळी मंगळवारी रात्री 11:30 वाजता ही घटना घडली.

हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, जंगी लाल म्हणाला, "माझ्या पत्नीला प्रसूती वेदना होत होत्या आणि मी तिला प्रसूतीसाठी तिथे घेऊन गेलो. माझ्या पत्नीला दाखल करण्याऐवजी रुग्णालयातील कर्मचारी उद्धटपणे वागले आणि लेबर रूमचे दरवाजे बंद केले. त्यांनी मला माझ्या पत्नीला अमृतसरला घेऊन जाण्यास सांगितले. रुग्णवाहिकेच्या चालकाने कर्मचाऱ्यांना माझ्या पत्नीला दाखल करण्याची विनंतीही केली होती, पण त्याचा काही उपयोग झाला नाही."

पीडितेच्या पतीने रुग्णालयातील कर्मचारी आणि व्यवस्थापनावर त्यांच्या उद्धट वर्तनाबद्दल कारवाई करण्याची मागणी केली. ते म्हणाले, "रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या अमानुष वागणुकीमुळे मला माझी पत्नी आणि बाळाचा जीव गमवावा लागला असता." तसेच रुग्णालाय कर्मचा-यांनी रुग्णालयातून बाहेर न पडल्यास पोलिसांना बोलावण्याची धमकीही दिल्याचा आरोपही जंगी लाल याने केला आहे.

याबाबत रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (SMO), डॉ. सुनील यांना विचारले असता त्यांनी कर्मचाऱ्यांच्या उद्धट वृत्तीचे आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र त्याच वेळी महिलेने जमिनीवर बाळंत झाल्याचे मान्य केले आहे. सुनील यांच्या माहितीनुसार, "ती महिला नऊ महिन्यांची गर्भवती होती, परंतु तिने कधीही तिच्या वैद्यकीय चाचण्या आणि अल्ट्रासाऊंड केले नव्हते. ते रुग्णालयात येताच आम्ही त्यांना मोफत सेवा देण्यासाठी आमच्याशी करार केलेल्या लॅबमधून प्रसूतीसाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय चाचण्या घेण्यास सांगितले. परंतु महिलेच्या पतीने त्यास नकार दिला." तसेच सुनिल हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोपही त्यांनी केला असून आपल्या पत्नीला लेबर रूममध्ये नेण्यासही त्यानेच नकार दिला होता, असे SMO सुनिल यांनी सांगितले.

घटनेविषयी डेप्यूटी कमिशनर हरबीर सिंग म्हणाले, "मी सिव्हिल सर्जनशी संपर्क साधला आहे आणि तपशील विचारला आहे पण मी उत्तरांनी समाधानी नाही. जर एखादी महिला रुग्णालयात दाखल झाली असेल तर तिची काळजी घेणे रुग्णालयाची जबाबदारी आहे. मी चौकशीचे आदेश दिले आहेत आणि दोषींवर कारवाई केली जाईल."

हे ही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news