

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : २०२५ साली आर्टेमिस ३ हे मानवी यान नासाकडून चंद्रावर उतरवले जाणार असून त्यात पुरुषासोबत एक महिला शास्त्रज्ञही प्रथमच चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. या मोहिमेच्या सर्व चाचण्या आणि निवड प्रक्रिया सुरु असल्याची माहिती नासाच्या सहप्रशासक कॅथरीन लुएडर्स यांनी दिली. (Artemis 3 )
आयआयटीचा टेकफेस्ट शुक्रवारी धुमधडाक्यात सुरु झाला. पहिल्याच दिवशी नासाच्या सहप्रशासक कॅथरीन यांचे भाषण ऐकण्यासाठी सभागृह तुडुंब भरले होते. दुपारच्या सत्रातील परिसंवादात त्या '२०५० पर्यंत जागतिक अवकाश' या विषयावर बोलताना चंद्रावरच्या मानवी मोहिमेची सविस्तर माहिती त्यांनी दिली. कॅथरीन म्हणाल्या नासाकडून विशेष म्हणजे स्त्री-पुरुष समानतेचा आणि त्यासोबतच वर्णभेद बाजूला ठेवून समतेचा संदेश या मोहिमेतून दिला जाईल. तो संदेश घेऊनच महिला आणि पुरुष चंद्रावर उतरणार आहेत. यापूर्वी अनेकदा पुरुषांनाच चंद्रावर पाठविण्यात आले. अपोलो मोहिमेअंतर्गत १९६९ ते १९७२ दरम्यान १२ पुरुष अंतराळवीर चंद्रावर उतरले. त्यातही गौरवर्णीय पुरुष पाठवण्यात येत होते. मात्र एकाही महिलेला आजवर चांद्रमोहिमेत स्थान देण्यात आले नाही. २०२५ मध्ये मात्र पहिल्यांदाच महिला शास्त्रज्ञ चंद्रावर जाईल. शिवाय या मोहिमेत कृष्णवर्णीयांना स्थान दिले जाईल.
नासाकडून २०२५ मध्ये आर्टेमिस ३ हे अभियान राबवल्यानंतर पुन्हा एकदा तीस दिवसाचे वेगळे मिशन राबवले जाणार आहे त्यामध्ये दोन आठवडे माणूस चंद्रावर राहील अशी योजना आहे. यासंदर्भातील तयारी सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
२०२५ मधील आर्टेमिस-३ मोहिमेसाठी नासाने एका महिलेची निवड केली आहे. ग्रीक पुराणकथा मध्ये मातृदेवतांना मोठे स्थान आहे. त्यातील आर्टेमिस ही चंद्राची देवी म्हणून मानली जाते. या चांद्रदेवीचे नाव धारण करणाऱ्या आर्टेमिस मोहिमेत महिला शास्त्रज्ञ चंद्रावर पाऊल ठेवणार हा देखील मोठा योग आहे.
येत्या काळात मंगळ ग्रहावर मानवसहित यान पाठविण्यासाठी एक संशोधन प्रकल्प राबविला जात असून, या मोहिमेचे आव्हानही नासा ने स्वीकारले आहे. मंगळवार मानव पाठविण्यासाठीचा प्रवास मोठा आहे. जाण्यासाठी ९ महिने लागतील आणि तितकाच काळ परतीच्या प्रवासाचा असेल. मंगळावर ६ महिने मुक्काम ठोकण्याचे नियोजन असल्याचेही कॅथरीन यांनी सांगितले.